जळगाव : मिळालेल्या माहितीच्या आधारे हद्दपार आरोपीचा शोध घेण्याकामी गेलेल्या पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रजनी रविंद्र खरात, राजकुमार रविकांत खरात, राजन रविकांत खरात (सर्व रा. समता नगर भुसावळ) या तिघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दाखल व जिल्ह्यातून हद्दपार जाहीर करण्यात आलेला आतिष रविंद्र खरात हा त्याच्या घरी आला असल्याची माहिती भुसावळ शहर पोलिसांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे 25 जुलै रोजी भुसावळ शहर पोलिसांचे पथक समता नगर भागात त्याच्या घरी गेले होते. पोलिस गेटमधे आल्याचे बघून रजनी खरात यांनी हात आडवा करुन पोलिसांची वाट अडवली. पोलिसांना जिन्याने वरच्या मजल्यावर जाण्यास मज्जाव करत आरडाओरड सुरु केली. तुम्ही पोलिस घरात कसे काय घुसले? मी तुम्हाला वरच्या मजल्यावर जावू देणार नाही. तुम्ही वरच्या मजल्यावर गेल्यास मी गॅसहंडी लिक करुन आग लावून देईन व खाली उडी मारुन देईन अशी धमकी दिली. महिला पोलिस आशा तडवी यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला गेला.
घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत ठेवलेल्या आडोशाला राजकुमार रविकांत खरात आणि राजन रविकांत खरात असे दोघे लपून बसले असल्याचे पोलिसांना आढळून आले. हे दोघेही जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार जाहीर केले असतांना ते आढळून आले. अंगझडती दरम्यान राजकुमार खरात याच्या पॅंटच्या आतील बाजूस एक चाकू आढळून आला. या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला 26 जुलै रोजी सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 115/22 भा.द.वि. 353, 323, 506, 34 सह आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी अटकेत नसून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अंबादास पाथरवट करत आहेत.