जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता “नाट्य संगीत रजनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रम सादर करणारे कलावंत मुंबईचे असून प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे आहेत. त्यांना तबल्याची साथ धनंजय पुराणिक व ऑर्गन ची साथ मकरंद कुंडले करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रख्यात अभिनेत्री दीप्ती भागवत करणार आहे. चुकवू नये असा हा कार्यक्रम तमाम जळगावकर रसिकांसाठी विनामूल्य असून सुरवातीच्या काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमास स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम वेळेत सुरु होणार असून रसिकांनी १० मिनिटे आधी आसनस्थ होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.