हेराफेरीचा टोल, वाटतो बराच खोल आणि गोल!!– कारवाईच्या खोदकामात किती होणार पोलखोल?  

जळगाव : जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण सुरु झाल्यापासून न्हाई अर्थात नॅशनल हायवे ऑथरिटी ऑफ इंडीया च्या कामांची विविध कारणांनी ओरड सुरु झाली. जळगाव – भुसावळ दरम्यान सिमेंट फॅक्ट्रीनजीक चौपदरीकरणाचे कामकाज रखडलेले असतांनाच टोल वसुली सुरु झाली. आकाशवाणी, इच्छादेवी आणि अजिंठा चौफुली या तिन चौकात बांधण्यात आलेल्या सर्कलचा मुद्दा तेथील अपघातावरुन वेळोवेळी गाजला.  चौपदरीकरणाच्या कामातील अनेक त्रुटींपासून सुरु झालेली ओरड सद्यस्थितीत टोल नाक्याच्या विषयावर येवून ठेपली आहे.

टोल नाक्यावरील पावत्यांच्या हेराफेरीचा विषय ताजा असतांनाच फास्ट टॅग मधे बॅलन्स नसल्याचे कारण सांगून रोखीने पैसे उकळले जात असल्याची नवीनच ओरड पुढे आली आहे. रोखीने पैसे दिल्यानंतर फास्ट टॅग खात्यातून देखील वाहनधारकांचे पैसे कपात होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दुहेरी आर्थिक फटका वाहनधारकांना बसत असल्याचे नुकतेच एका वकील महोदयांच्या माध्यमातून उघड झाले आहे. अ‍ॅड. विजय बाबुलाल दाणेज हे जळगावच्या विसनजी नगर मधील रहिवासी विधी तज्ञ आहेत. नशिराबाद टोल नाक्यावर बोगस पावती देवून त्यांची फसवणूक झाल्याचा नवा प्रकार उघडकीस आल्याने गोंधळात अजूनच भर पडली आहे.

सर्व्हर सोबत न जोडलेल्या बोगस मशिनमधून बोगस पावत्या वाहनधारकांना देवून होणारी लुट समोर आली, नव्हे आणली गेली. एवढे गंभीर प्रकार होत असतांना देखील न्हाईचे जळगाव येथील अधिकारी चंद्रकांत सिन्हा कोणतीही कायदेशीर फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहेत?  हा एक जटील प्रश्न जळगावकरांना पडला आहे. हा सुर्य आणि हा जयद्रथ असे समोर आणून देखील न्हाईचे अधिकारी सिन्हा हे  कॉन्ट्रॅक्ट बघून फिर्याद दाखल करण्याची भाषा करत आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या पुढाकाराने या टोल नाक्यावरील बोगस पावत्यांचा झोल उघडकीस आला आहे. पोलिसांचा छापा पडताच टोल कार्यालयातील पाच कर्मचारी घटनास्थळावरुन पलायन करण्यात यशस्वी झाले. टोल नाक्यावरील सर्व्हरसोबत कनेक्टेड नसलेल्या हँडमेड मशीनच्या पावत्या वाहनधारकांना दिल्या जात असल्याचे पोलीस पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरुन टोल नाक्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यानंतर न्हाईचे वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांच्याशी संपर्क साधून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपककुमार गुप्ता यांनी केली. मात्र सिन्हा यांनी उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सिन्हा आणि गुप्ता यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचे ऐकण्यात आले. आपल्यामुळेच मिडीयाने मला व्हिलन केले असा सिन्हा यांनी गुप्ता यांच्यावर आरोप केला आहे.

पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांचे वाचक सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला व त्यांच्या सहका-यांच्या पथकाने तक्रारदार सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना सोबत घेवून नशिराबाद टोल नाक्यावर धाड टाकली होती. या वादग्रस्त टोल नाक्यावर अजून किती कारनामे उघडकीस येतील? याप्रकरणी न्हाईचे अधिकारी सिन्हा गुन्हे दाखल करतील काय हे बघणे उचीत ठरणार आहे. अन्यथा पोलिसांनाच या प्रकरणी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करण्याची वेळ येईल काय हे देखील पाहणे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here