जळगाव : दुचाकीला ओव्हरटेक केल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून बस चालकाला त्याच्या सिटवरुन खाली खेचून शिवीगाळ करत कॉलर पकडून बेदम मारहाण केल्याची घटना 16 जुलै रोजी घडली होती. चाळीसगाव तालुक्यातील दहिवद गावानजीक घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
आबा लक्ष्मण नालकर रा. सिंधी ता. चाळीसगाव असे मारहाण झालेल्या बस चालकाचे नाव आहे. चाळीसगाव बस आगारात ते नोकरीला असून 16 जुलै रोजी चाळीसगाव कुंझर (एमएच 20 डी 9806) या बसवर त्यांची ड्युटी लावण्यात आली होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास ते चाळीसगाव येथून कुंझरच्या दिशेने प्रवाशांनी भरलेली बस घेऊन निघाले होते. चाळीसगाव – धुळे रस्त्यावरील हॉटेल विराम गार्डननजीक त्यांच्या ताब्यातील बसच्या पुढे दोन दुचाकी डबल सीट धावत होत्या. त्यावेळी बस चालक आबा नालकर यांनी दोन्ही दुचाकींच्या पुढे आपली बस पुढे नेली.
आपल्या दुचाकीला ओव्हरटेक करुन बस पुढे गेल्याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघांनी मिळून भोसर फाट्याजवळ बस अडवून थांबवली. त्यातील एकाने “तू आमच्या मोटरसायकलला ओव्हरटेक का केले असे म्हणत शिवीगाळ सुरु केली. “तू दहिवद गावाजवळ ये तुला पाहून घेतो’ अशी धमकी देत दुचाकीस्वार पुढे निघून गेले. दहीवद या गावी काही प्रवासी उतरल्यानंतर पुन्हा तिघांनी बस चालक नालकर यांना खाली खेचून कॉलर पकडून शिवीगाळ करत मारहाण केली.