मुंबई : संजय राऊत आमची प्रत्येक सकाळ खराब करायचे. आज ईडीने त्यांच्या घरी धाड टाकून त्यांची सकाळ खराब झाली आहे. हे बघून आपल्याला निश्चितपणे समाधान वाटत असल्याचे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. पत्राचाळमध्ये जे गरीब रहिवासी होते त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. संजय राऊत स्वत:ला खूप मोठे समजायचे……..असे देखील नितेश राणे यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीची धाड पडल्यानंतर भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ते चौकशीला गेले नाहीत म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली, असे शिंदे गटाचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी देखील आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. ते म्हणाले की राऊत यांनी भ्रष्टाचार, लूटमार, माफियागिरी केली. आता या सगळ्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राऊत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ते राऊत यांचे भागीदार झाले होते. मात्र आता राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. राऊत यांचा मुक्काम नवाब मलिकांच्या शेजारी असावा, ही माझी प्रार्थना आणि इच्छा असल्याचे देखील किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.