जळगाव : एकट्यादुकट्या वयोवृद्ध आणि धनिक प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवून वाटेत निर्मनुष्य जागी त्यांना लुटण्याचे अनेक प्रकार यापुर्वी जळगाव शहरात घडलेले आहेत. घडलेले हे प्रकार पोलिसांनी उघड देखील केले आहेत. पोलिसांच्या अभिलेख्यावरील हे गुन्हेगार असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. रिक्षा चालकाच्या भुमिकेत राहून आपल्याच गुन्हेगार मित्रांना प्रवाशाच्या रुपात आधीच बसवून नंतर बसलेल्या प्रवाशाची वाटेत लुटमार करण्याची पद्धत काही गुन्हेगारांनी अवलंबली आहे. असाच एक प्रकार 29 जुलै रोजी नाशिकच्या वयोवृद्धाच्या बाबतीत जळगाव शहरात घडला. घटनेच्या दुस-या दिवशी 30 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच 31 जुलै रोजी एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या घटनेतील तिघांपैकी दोघांना अटक केली आहे.
उत्तमराव नामदेव वाघ हे नाशिकच्या द्वारका परिसरात राहणारे 78 वर्ष वयाचे जेष्ठ नागरिक आहेत. रेल्वेत सिनीयर सेक्शन इंजीनिअर पदावरुन ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या तिस-या क्रमांकाच्या मुलीचे सासर जळगावला आहे. मुलीच्या भेटीसाठी ते अधुनमधून जळगावला येत असतात. जळगाव रेल्वे स्टेशनवरुन महाबळ – गाडगे बाबा चौकाच्या स्टॉपवर शेअरिंग पद्धतीची रिक्षा करुन ते नेहमी मुलीच्या घरी जात असतात.
29 जुलै रोजी नेहमीप्रमाणे ते मुलीच्या भेटीसाठी जळगावला आले. एका रिक्षा चालकाने त्यांना बाबा कुठे जायचे आहे अशी विचारणा केली. गाडगे बाबा चौकात जायचे सांगितल्यावर त्या रिक्षाचालकाने त्यांना बसवून घेतले. बस स्थानक, कलेक्टर कार्यालय मार्गे रिक्षा न नेता एका प्रवाशाला सोडण्यासाठी त्याने इच्छादेवी चौक – डी मार्ट मार्गे रिक्षा नेली. वाटेत त्या प्रवाशाला सोडल्यानंतर त्याने पाचोरा रस्त्याने पुढे रिक्षा नेली. आपण वेगळ्याच मार्गाने जात असल्याचे लक्षात आल्यावर उत्तमराव वाघ यांनी रिक्षाचालकाला हा कोणता रस्ता आहे? तुम्ही कुठे नेत आहात? अशी विचारणा केली. मी तुम्हाला शॉर्ट कटने नेतो असे म्हणत पुढे नेले.
काही अंतर पुढे गेल्यावर लघुशंकेला जाण्याचा बहाणा करत त्याने रिक्षा उभी केली. तो जागेवरुन उठून गेल्यावर काही वेळाने चाकू घेऊन एक तरुण त्याठिकाणी चाकू घेऊन आला. आल्या आल्या त्या तरुणाने वाघ यांच्या मानेवर तो चाकू लावला. त्यांच्या शेजारी प्रवाशाच्या रुपात बसलेल्या तरुणाने देखील काहीतरी टोकदार वस्तू त्यांच्या मानेला लावली. तुमच्याजवळ असलेले पैसे व मोबाईल ब-या बोलाने काढून द्या अशी त्यांना धमकी देण्यात आली. आपला लाख मोलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्ना असलेल्या उत्तमराव वाघ यांच्या खिशातील चार हजार रुपये रोख आणि मोबाईल तिघांनी काढून घेत घटनास्थळावरुन पलायन केले. या घटनेची माहिती मुलीला देण्यासाठी त्यांच्याकडे मोबाईल देखील शिल्लक नव्हता. अखेर त्यांनी कसेबसे आपल्या मुलीचे घर गाठून आपबिती कथन केली. मुलीने त्यांना धीर देत शांत केले. तो दिवस असाच गेला.
दुस-या दिवशी या घटनेचा गुन्हा नोंद करण्यासाठी उत्तमराव वाघ यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. पो.नि. प्रताप शिकारे यांची भेट घेत त्यांना सर्व प्रकार कथन केला. पो.नि.शिकारे यांच्या आदेशाने या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी या घटनेला गांभिर्याने घेतले. या घटनेचा तातडीने तपास लावण्याचा वरिष्ठ पातळीवरुन आदेश निघाला. पो.नि. प्रताप शिकारे यांनी आपल्या सहका-यांना तपासकामाच्या सुचना दिल्या. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे सुप्रिमो सहायक फौजदार अतुल वंजारी व त्यांची टीम कामाला लागली. सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी स्वत: आपल्या पथकासमवेत या गुन्ह्याच्या शोधकामी कंबर कसली. फिर्यादी जेष्ठ नागरीक उत्तमराव वाघ यांना धीर देत घरी जावून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.
पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आकाश उर्फ चोक्या अरुण जोशी तसेच लक्ष्मण उर्फ चिंट्या खेमचंद जोशी (दोघे रा.जोशी कॉलनी सिंधी कॉलनी जवळ जळगाव) यांनीच हा गुन्हा केला असल्याची गोपनीय माहिती पो.नि. शिकारे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, किशोर पाटील, मुदस्सर काझी, छगन तायडे, सचिन पाटील यांच्या पथकाने दोघांना आठवडे बाजार परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांना आधी प्रेमाने नंतर गरजेनुसार पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांच्याकडून अद्याप मोबाईल व रोख रक्कम हस्तगत करण्याचे काम बाकी आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे व सचिन मुंडे करत आहेत. आकाश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, अग्नीशस्त्र बाळगणे, चोरी करणे आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अटकेतील दोघांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दोघांचा तिसरा साथीदार फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.