औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा वाजेनंतर ध्वनीप्रदूषण न करण्याबाबतचे नियम आहेत. ते नियम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौ-याप्रसंगी अजिबात पाळण्यात आले नाही. औरंगाबाद येथील दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारच्या पहाटे तीन वाजेपर्यंत रॅली, भाषणे व स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. त्यामुळे आयोजकांसह मुख्यमंत्री शिंदे याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी क्रांती चौक व वेदांत नगर पोलिस स्टेशनला दोघा जणांनी केली आहे.
रविवारी सकाळच्या टप्प्यातील कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री दुपारी सिल्लोड येथे गेले होते. तेथून परत येण्यास त्यांना उशीर झाला. त्यामुळे शहरातील इतर राहिलेले कार्यक्रम सकाळी उशिरापर्यंत सुरु होते. सकाळी दहा ते रात्री दहा असे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाचे नियोजन होते. मात्र नियोजन पुर्णपणे बिघडले व सर्व कार्यक्रम पहाटे तीन वाजेपर्यंत सुरुच होते. त्यामुळे पोलिस यंत्रणेला पहाटे तिन वाजेपर्यंत बंदोबस्त कायम ठेवणे भाग पडले. परस्पर मार्ग बदलणे, कुठेही वाहनांचा ताफा थांबवणे तसेच कुणीही त्यांना भेटायला जाणे असे प्रकार घडल्याने पोलिस सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण पडला होता.