उ.म.वि. ला जाणा-या सिटी बसेस सुरु होण्याची मागणी

On: August 3, 2022 6:12 PM

जळगाव : कोरोनाची लाट ओसरुन सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. तरी देखील जळगाव जुने बस स्थानक ते उ.म.वि. आणि उ.म.वि. ते जुने बस स्थानक या मार्गावरील सिटी बसेस अद्याप बंदच आहेत. यासंदर्भात सामाजिक तथा  माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे तसेच मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांना पत्र देऊन बसेस सुरु करण्यासह विद्यार्थ्यांना मासिक पास सुरु करण्याची मागणी केली आहे. आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना पालकवर्गातून आलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांनी सीटी बसेस सुरु करण्याचा पाठपुरावा सुरु केला आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात शिक्षण घेण्यासाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असतात. जळगाव शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उ.म.वि. त जाण्यासाठी सीटी बसेस नसल्यामुळे विद्यार्थी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक बजेटसह वेळेचा ताळमेळ बसत नसल्याची ओरड विद्यार्थी वर्गातून होत आहे.

विद्यापिठात जाण्यासाठी नाईलाजाने विद्यार्थ्यांना रिक्षाचा पर्याय निवडावा लागत आहे. जळगाव शहरातील विद्यार्थ्यांना ते रहात असलेल्या निवासस्थानापासून रिक्षासाठी महामार्गावर यावे लागते. त्यानंतर शेअरिंग पद्धतीने रिक्षाने उ.म.वि. ला जावे लागते. रिक्षाचालक फ्रंट सिटसह मागे विद्यार्थ्यांना ठासून ठासून रिक्षात बसवून नेतात. त्यामुळे महामार्गावर अशा प्रकारचा प्रवास धोकादायक आहे. या प्रवासकामी विद्यार्थ्यांना किमान 80 ते 100 रुपये दररोजचा खर्च येत आहे. सिटी  बसेस नसल्यामुळे दरमहा एका विद्यार्थ्याला साधारण तिन हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च विद्यार्थीवर्गासह त्यांच्या पालकांना परवडणारा नाही. एवढा खर्च करुन देखील प्रवास जीवघेणा आहे. स्वत:च्या दुचाकीने गेले तरी देखील हा प्रवास परवडणारा नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेच्या हितासाठी सीटी बसेस सुरु होणे गरजेचे असून सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता याकामी प्रयत्नशिल आहेत. 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment