मुंबई : आज दुपारी उल्हासनगर येथे एका नाश्त्याच्या हॉटेलमध्ये अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या भिषण स्फोटात एकाचा मृत्यू तर काही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भितीपोटी कित्येक दुकानदारांनी आपली दुकाने बंद करुन पळ काढला. मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे आग आटोक्यात आली. कॅम्प नं-४ ओ टी सेक्शन येथे लागलेल्या या आगीत दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागेवरच मृत्यू झाला.
इतर अकरा जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी आल्यावर काही वेळात आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आग आटोक्यात आली. दिनेश गुप्ता, मनोज जैस्वाल, लक्ष्मण, दुलारी, आशिष, राजकुमार प्रजापती व मगरू सोणकर अशी जखमींची नावे आहेत. जखमींची वैद्यकीय उपचारासाठी मध्यवर्ती रूग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. या भिषण आगीत नाश्त्याचे दुकान जळून खाक झाले आहे. दुकानातून दोन गॅस सिलेंडर काढण्यात यश आले.