चाकू हल्ला करणा-या तरुणासह साथीदारांना अटक

जळगाव : सायकलस्वारास धडक देवून सायकलचे अतोनात नुकसान करणा-या दुचाकीस्वारांना समजावण्यासाठी गेलेल्या दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला करणा-या तरुणासह त्याला गुन्ह्यात साथ देणा-या दोघा साथीदारांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. दिपक संजय साळुंखे (23) रा. प्रजापती नगर ममुराबाद रोड जळगाव, शैलेश शंकर चौधरी (19), गणेश भास्कर सोनार (23) लक्ष्मी नगर साईबाबा मंदीराजवळ तांबापुरा जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या तिघा तरुणांची नावे आहेत.

राकेश गोपाळ पाटील या तरुणाची महामार्गावर गोदावरी इंजीनिअरिंग महाविद्यालयानजीक चहा व पानटपरी आहे. त्याच्या टपरीवर त्याचा मित्र सुशिल मनोज जाधव हा त्याला भेटण्यासाठी येत असतो. 9 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दोघे मित्र टपरीवर हजर होते. त्यावेळी कालिका माता मंदीराकडून तिघे तरुण मोटार सायकलवर त्याठिकाणी आले. त्यातील चालक तरुणाने एका सायकल स्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत सायकलस्वाराच्या ताब्यातील सायकलची रिंग पुर्णपणे वाकली.

या जोरदार अपघातामुळे घटनास्थळी गर्दी जमली. राकेश पाटील, सुशिल जाधव आणि बेकरीचालक सुमित पाटील या तिघांसह उपस्थितांनी त्या तरुणांना सायकलस्वाराच्या सायकलची नुकसान भरपाई देण्यास सांगितले. त्यावेळी मोटार सायकलवरील तिघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान राकेश पाटील आणि सुशिल जाधव हे दोघे मित्र पानटपरीवर परत आले. पानटपरीवर परत आलेल्या दोघांसोबत तिघा मोटारसायकलस्वार तरुणांनी शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली.

दरम्यान त्यातील एकाने फोन लावून त्यांच्या दोघा साथीदारांना चाकू घेवून घटनास्थळी बोलावून घेतले. आलेल्या दोघांपैकी एकाने वाद घालणा-या तरुणाच्या हातात चाकू दिला. हातात चाकू येताच त्या तरुणाने टपरी चालक राकेश पाटील यास शिवीगाळ करत पोटात चाकू मारुन गंभीर जखमी केले. जखमी राकेशला वाचवण्यासह वाद सोडवण्यासाठी सर्वजण धावून गेले. त्याच चाकूने बेकरीचालक सुमित पाटील याच्या पाठीवर त्या संतप्त तरुणाने चाकू हल्ला केला. सर्व पाचही तरुणांनी टपरीचालक राकेश पाटील याच्या टपरीमधील सामानाची नासधुस करत पळून गेले.

या घटनेप्रकरणी सुशिल मनोज जाधव याने अज्ञात हल्लेखोर तरुणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 520/22 भा.द.वि. 326, 324, 427, 504, 34 नुसार दाखल करण्यात आला. सदर गुन्हा रात्रीच्या वेळी घडला होता. हल्लेखोरांच्या ताब्यातील दुचाकीचा क्रमांक देखील फिर्यादी सुशिल जाधव यास माहिती नव्हता. हल्लेखोर अनोळखी होते. सदर हल्ला कुणी केला याबाबत कुणलाच काही माहिती नव्हती. गुन्हेगारांनी कुठलाही पुरावा ठेवलेला नव्हता. तरी देखील या घटनेचा कसून तपास सुरु होता.

तपासादरम्यान पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, किशोर पाटील, सचिन पाटील, मुदस्सर काझी व छगन तायडे यांच्या पथकाने प्रजापत नगर, सम्राट कॉलनी, लक्ष्मी नगर परिसरातून तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्यांना 12 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी व त्यांचे सहकारी संदीप धनगर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here