छप्पर फाटले पत्र्याचे, बिबट्या पडला घरात—- कुटूंब सदस्य खिडकी तोडून पळाले दारात!

नाशिक : मांजरीचा पाठलाग करतांना पत्र्याचे छत असलेल्या घरावर झेप घेणा-या बिबट्याच्या वजनाने छप्पर फुटून तो घरात कोसळला. बुधवारच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील लहवीत या गावातील आंबडगावठा येथे हा प्रकार उघडकीस आला. मांजरीचा जीव वाचला मात्र घरातील सदस्य जीवन मरणाच्या सिमेवर आल्याने जीव मुठीत घेवून बसले होते.

बुधवार 10 ऑगस्टच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात भ्रमण करणा-या बिबट्याच्या नजरेस एक मांजर पडली. मांजरीला आपल्या टप्प्यात घेण्यासाठी त्याने पाठलाग सुरु केला. मांजर व बिबट्या यांच्या शर्यतीत पुढे असलेल्या मांजरीने एका पत्र्याचे छत असलेल्या घरावर उडी मारुन पलायन केले. मांजरीच्या वजनाने छत काही तुटले नाही मात्र बिबट्याच्या किमान 80 किलोच्या पुढे असलेल्या वजनाने पत्र्याचे छत तुटले आणि बिबट्या घरात पडला.

घरात शुभम गायकवाड हा तरुण हॉलमधे तर त्याची आई, बहिणी अशा महिला दुस-या खोलीत झोपल्या होत्या. पंख्याच्या आवाजाने महिला वर्गाला एकदम जाग आली नाही. मात्र अंगावर पांघरुन घेतलेल्या शुभमला रात्रीच्या अंधारात अचानक आवाज आल्याने जाग आली. त्याला भलीमोठी प्राण्याची आकृती दिसली. साक्षात मृत्यू त्याच्या नजरेसमोर उभा होता.

अजिबात हालचाल न करता शुभम तसाच पडून बिबट्याचे निरीक्षण करु लागला. शुभमला ओलांडून बिबट्या घरातील टेबलाजवळ गेला. बिबट्या काही वेळ निवांत बसल्याचे बघून शुभमने आई व बहिणी झोपलेल्या खोलीत हळूच शिरकाव करत आतून दार लावून घेतले. त्यांना जागे करुन कमी शब्दात सत्य परिस्थिती कथन करत खिडकी तोडून बाहेर निघण्यास सांगितले. खिडकी तोडून सर्वजण घराबाहेर आल्यानंतर परिसरातील नागरिकांना जागे करण्यात आले. वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र दरम्यानच्या कालावधीत बिबट्याने छताच्या पत्र्यावर उडी मारुन पलायन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here