मुंबई : ऑर्केस्ट्रामध्ये एक दोन गाणी म्हटल्याने आपण मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर काहीही बोलू शकत नाही. असा सल्ला आपल्याला कुणी दिला आहे ? बाईसाहेब जरा सांभाळून…….अशा शब्दात माजी पोलीस अधिकारी विश्वास कश्यप यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकच्या माध्यमातून पत्र लिहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग याच्या कथित आत्महत्येच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांवर दबाव असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टीकाटीप्पणी केली आहे. आपल्याला मुंबईत राहणे सुरक्षीत वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माजी पोलिस अधिकारी विश्वास कश्यप यांनी फेसबुकच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांना खुले पत्र लिहिले असून त्यात सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. पत्राच्या सुरुवातीलाच त्यांनी सौ. अमृताबाई फडणवीस, पत्नी माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, नागपूर अशी सुरुवात केली आहे. त्यानंतर पुढील मजकुरात त्यांनी म्हटले आहे की महोदया, आपल्याला का म्हणून पत्र लिहावे ? पत्राचा मायना काय असावा? याबाबत विचार करत होतो.
कुणालाही पत्र लिहितांना त्या व्यक्तीचे पद मग ते राजकीय, धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे असो, त्याचा उल्लेख करावा लागतो. त्यादृष्टीने आपण कोणत्याही पक्षाच्या पदावर नाहीत, कोणत्याही सामाजिक, धार्मिक, संस्थेच्या पदाधिकारी नाहीत. कदाचित असालही. परंतु ते आमच्यासारख्या पामराला माहीत नसावे. पत्रात आपला उल्लेख करताना माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असा केला आहे . कारण त्या पलीकडे आपली स्वतंत्र अशी ओळख आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाही.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर आपला उदय झाला. त्यापुर्वी आपण केलेले कोणतेही महान कार्य महाराष्ट्राच्या पुढे आले नाही. पत्र लिहिण्यास कारण की, सुशांतसिंग राजपुत प्रकरणी आपण मुंबई पोलिसांवर केलेल्या टिकेबाबत आपल्याशी काही मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी हा पत्रप्रपंच अशा शब्दात माजी पोलिस अधिकारी विश्वास कश्यप यांनी खरपुस समाचार घेतला आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की अमृताबाई, मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल, त्यांच्या किर्तीबद्दल आपल्याला काय आणि किती माहिती आहे? आपला त्याबाबत अभ्यास काय आहे? मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल तुम्ही कुठे दोन चार ओळी वाचल्या आहेत का? उगाचच उचलली जीभ ……
पुढे कश्यप यांनी म्हटले आहे की …. सुशांतसिंगच्या तपासाबद्दल ट्वीट करताना आपण लिहिता की, मुंबई सुरक्षित नाही. एकंदरीत मुंबई पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नाही. मुळात पोलिसांचा तपास कसा काय असतो? तो तपास कश पद्धतीने केला जातो? याबाबत आपल्याला कायदेशीर ज्ञान आहे का? याचे उत्तर नाही…. असेच आहे. आपण अॅक्सीस बँकेत काम करणाऱ्या एक कारकून महिला. आमच्या दृष्टीने कुणी क्लास वन, क्लास टू असला तरी तो कारकुंडाच असतो बर का. कारण क्लास कोणताही असला तरी शेवटी काम कारकुनाचेच असते.
पुढील मजकुरात माजी पोलिस अधिकारी म्हणतात की ……..आपल्या पतीदेवाच्या कृपेने मृतावस्थेतील अॅक्सीस बँकेला संजीवनी देण्याचे कार्य आपण केले आहे. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगार अॅक्सीस बँकेत वळवले असे समजते. कोट्यावधीचा तो व्यवहार होता. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने तो एक आर्थिक घोटाळा आहे असे आपणास वाटत नाही का? सरकारी कार्यालयातील युनियनने देखील त्याबाबत आक्षेप घेतल्याचे दिसून आले नाही. सरकारी वेळेपेक्षा १२ ते १३ मिनिट जास्त काम करायला सांगितले तर संघर्ष करण्यास फणा काढुन ही मंडळी उभी असते.
त्यानंतर पुढील मजकुरात कश्यप यांनी आपल मोर्चा त्यांच्या बदलीच्या मुद्द्यावर वळवला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की आपण मुख्यमंत्र्यांची पत्नी झाल्याबरोबर अॅक्सीस बँकेने आपली बदली नागपूरहून थेट मुंबईला केली. सर्वसाधारण बाईला दादर पूर्व शाखेतून दादर पश्चिम शाखेत बदली करायची असल्यास काय दिव्य करावे लागते हे त्या माउलीला कधीतरी विचारुन बघा. अॅक्सीस बँकेला दिलेल्या संजीवनी बुटीमुळे आपणास मोठे पद बहाल करण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. साध्या कर्मचाऱ्याने बँकेला कितीही व्यवसाय मिळवून दिला तरी त्याला कुणी हिंग लावून विचारत नाही असे पुढे म्हटले आहे.
बढती ही स्वतःच्या हिमतीवर असावी, नाही का? असा टोला त्यांनी लगावला आहे. सुशांतसिंग याच्या कथित आत्महत्या प्रकरणी त्यांनी पुढे पत्रात म्हटले आहे की …….
या प्रकरणात तुम्ही लक्ष घालायला नको बाईसाहेब. ही फिल्मी मंडळी कशी आहेत हे आपल्याला माहीतच नाही. ते कसे असतात ते आम्हा पोलिसांना विचारा. ही फिल्मी मंडळी एक नंबरची स्वार्थी आणि घाणेरडी असतात असे म्हटले आहे . नैतिकता वगैरे शब्द त्यांनी बेडखाली गुंडाळून ठेवलेला असतो. या फिल्म इंडस्ट्रीबद्दल आपणास आपुलकी का वाटावी असा प्रश्न कश्यप यांनी अमृता फडणवीस यांना विचारला आहे. जंगी पार्ट्यांमधे आपणास गाणे गाण्याची संधी दिली म्हणून की काय?
अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरात करण्याची संधी मिळाली म्हणून का? अहो त्या अमिताभ बच्चन सारखा स्वार्थी माणूस फिल्म इंडस्ट्री मध्ये शोधून सापडणार नाही असे खडे बोल कश्यप यांनी पत्रात सुनावले आहे. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय बच्चनजी कुणाकडे हसत देखील नाही असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. यासह माजी पोलिस अधिकारी विश्वास कश्यप यांनी फेसबुकच्या माध्यमातून लिहिलेल्या पत्रात अमृता फडणवीस यांचा खरपुस समाचार घेतला आहे. पत्राच्या शेवटी शेवटी कश्यप यांनी अमृता फडणवीस यांना प्रश्न केला आहे की बाईसाहेब, तुम्हाला जर मुंबईमधे सुरक्षित वाटतच नसेल तर कशाला मुंबईमधे राहतात? रहा ना तिकडे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये.
आपल्या पतीदेवांनी पाच वर्षे गुजरातसाठी, दोन गुजरात्यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्रात राहून काम केले आहे. अगदी तसेच तुम्ही बिहारमध्ये जाऊन सुशांतसिंगच्या घराच्या शेजारी घर घेऊन रहा आणि बिहारचे कल्याण करा असा सल्ला दिला आहे. माजी पोलिस अधिकारी विश्वास काश्यप यांनी तेवीस वर्ष मुंबई पोलीस दलात सेवा बजावली आहे. सन १९९२ मध्ये एमपीएससी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांची पीएसआयपदी नेमणूक झाली होती. त्यानंतर सन २०१४ मध्ये त्यांनी पोलिस दलातील सेवेची १५ वर्ष बाकी असतानांच सेवानिवृत्ती घेतली. सध्या ते पूर्ण वेळ उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करतात.