जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : वर्षा समाधान कोळी जेमतेम वीस वर्षाची तरुणी होती. बारावीचे शिक्षण घेण्यासाठी ती चोपडा येथील एम. जी. महाविद्यालयात जात होती. विशीच्या अल्लड वयात तिचे राकेश संजय राजपूत या बावीस वर्ष वयाच्या तरुणासोबत प्रेम जडले होते. सुरुवातीला दोघांची नजरानजर झाली. दोघांचा नजरेचा खेळ संभाषणात आणि लवकरच सहवासात परावर्तीत झाला. चोपडा येथील एम.जी. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेणा-या वर्षाचे वडील समाधान कोळी नगरपालिका रुग्णालयात वॉचमनची नोकरी करतात. समाधान कोळी आणि रत्नाबाई कोळी या दाम्पत्याला दोन मुले व दोन मुली अशी चार अपत्य. त्यापैकी मोठी विवाहीत मुलगी तिच्या सासरी सुखाने संसार करत आहे.
कोळी दाम्पत्याची दुसरी मुलगी वर्षा गावातीलच राकेश संजय राजपूत या तरुणाच्या प्रेमात पडली होती. चोपडा शहरातील सुंदरगढी परिसरात वर्षा तर रामपुरा परिसरात राकेश रहात होता. दोघांच्या प्रेमाचा सिलसिला गेल्या एक वर्षापासून सुरु होता. प्रेम हे लपून रहात नाही असे म्हणतात. विशीतील तरुण अथवा तरुणीचे प्रेम त्यांच्या देहबोलीतून लागलीच ओळखले जाते. मात्र त्यासाठी पालकांची पारखी नजर असावी लागते. मात्र आजकाल धकाधकीच्या जीवनात प्रापंचीक अडचणी सोडवण्यात गर्क असलेल्या पालकांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही हे देखील कमी अधिक प्रमाणात तेवढेच खरे आहे.
मात्र वर्षाचा लहान भाऊ थोडा तेज बुद्धीचा होता. बहिण वर्षाचे गावात कॅटरिंगचे काम करणा-या राकेश सोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याची कुणकुण त्याला लागली होती. आपल्या बहिणीसोबत परक्या तरुणाने बोलू नये, तिला कुणी फिरायला घेऊन जावू नये असे त्याला वाटत होते. आपली बहिण राकेश सोबत हसते, बोलते आणि फिरते हे बघूनच तो अस्वस्थ झाला. काही मित्रांकडून या गोष्टीची त्याला भणक लागल्यानंतर त्याचे मन अस्वस्थ झाले. हा प्रकार त्याने घरात आई वडीलांना कथन केला. त्यामुळे राकेश या तरुणासोबत वर्षाचे सुरु असलेल्या प्रेम प्रकरणामुळे घरात वाद सुरु झाले. घरातील वातावरण दुषीत झाले होते.
आई वडीलांसह तिच्या दोघा लहान भावांनी तिला समजावण्याचा खुप प्रयत्न केला. आपली समाजात थोडीफार इज्जत आहे. आपल्याकडे पैसा अडका कमी असला तरी चार चौघात व समाजात असलेली इज्जत हीच आपली दौलत असल्याचे तिला समजावण्यात आले. मात्र अल्लड वयातील वर्षाला या गोष्टी समजण्या पलीकडच्या होत्या. या सर्व गोष्टी तीच्या डोक्यावरुन जात होत्या. एका कानाने ऐकलेली गोष्ट ती दुस-या कानाने सोडून देत होती. आपली मुलगी आपले ऐकत नाही, आपली बहिण आपले ऐकत नाही म्हणून तिच्या आई वडीलांसह तिच्या दोघा लहान भावांना तिचा राग येत होता. मात्र त्याचे तिला काही सोयरसुतक नव्हते. ती राकेशच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.
अखेर 12 ऑगस्टचा 2022 चा तो दिवस आणि ती रात्र जवळ आली. हा दिवस राकेश आणि वर्षा यांच्या जीवनातील अखेरचा दिवस आणि अखेरची रात्र होती. या रात्री सोबत पळून जाण्याचे दोघांनी नियोजन केले होते. 12 ऑगस्टच्या रात्री आठ – साडे आठ वाजेच्या सुमारास राकेशचे तिच्या घराजवळ येण्याचे व तिने घराबाहेर येवून त्याच्यासोबत पळून जाण्याचे ठरले. या दिवशी वर्षासह तिचे दोघे लहान भाऊ तसेच मावस भाऊ तुषार कोळी, चुलत भाऊ भरत रायसिंग असे सर्वजण घरात हजर होते. वर्षाचा लहान भाऊ घराबाहेर गेला असता त्याची नजर राकेश आणि वर्षा यांच्यावर गेली. दोघे जण पळून जाण्याच्या बेतात होते. त्याने जोरात हाक मारुन घरातील सर्वांना हाक मारुन पटकन बाहेर बोलावले. बाहेर राकेशने वर्षाचा हात आपल्या हातात घेतला होता. तो तिला पळवून नेण्याच्या पुर्ण तयारीनिशी आला होता.
वर्षाचे सर्व भाऊ बाहेर आल्याचे बघताच राकेशने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. एका बाजूने वर्षाचे दोन सख्खे भाऊ, मावस भाऊ आणि मित्र असे सर्व जण आणि दुस-या बाजूने वर्षा व तिचा प्रियकर राकेश असे दोन गट पडले होते. सर्व जण वर्षाचा हात राकेशच्या हातातून सोडवण्यासाठी सक्रीय झाले होते. वादाची ठिणगी पडल्याचे बघून राकेशने देखील आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
आपण दोघेजण पळून जावून लग्न करु असे तो वर्षाला सर्वांसमोर ओरडून सांगत होता. संतापाच्या भरात वर्षाचा मावस भाऊ तुषार कोळी याने राकेशची कॉलर पकडली. तु माझी कॉलर पकडणारा कोण? असा प्रश्न राकेशने तुषारला केला. आपल्यावरील संभाव्य हल्ला परतवून लावण्यासाठी राकेशने सर्वांना शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्कीचा प्रकार सुरु केला. प्रकरणाने हिंसक वळण घेण्यास सुरुवात केली होती. वर्षाचे दोघे लहान भाऊ, तुषार कोळी व भरत रायसिंग अशा चौघांनी बळाचा वापर करुन राकेशला पकडून घरात नेले. त्यांच्या पाठोपाठ वर्षा देखील घरात आली. चार भिंतीच्या आड आणल्यानंतर चौघांनी राकेशला आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात वर्षाला देखील तिच्या भावांनी कमी अधिक प्रमाणात मारहाण केली.
त्यानंतर वर्षाच्या लहान भावाने त्याच्या मोटार सायकलवर राकेश यास सक्तीने बसवले आणि तो पळून जावू नये म्हणून त्याच्या मागे भरत रायसिंग हा ट्रिपल सिट बसला. तुषार कोळी याच्या मोटारसायकलवर वर्षा व तिच्या मागे तिचा सर्वात लहान भाऊ असे तिघे ट्रिपल सिट बसले. दोघा मोटार सायकल चालकांनी आपल्या ताब्यातील मोटार सायकली वराड फाट्यावर आणल्या. त्यावेळी रात्रीचे नऊ वाजून गेले होते. आता काहीतरी अघटीत होणार हे राकेश आणि वर्षा या दोघांच्या लक्षात आले होते.
या ठिकाणी आल्यावर पुन्हा वादाला सुरुवात झाली. आता आपल्याला एकतर मार बसणार अथवा वेळ प्रसंगी आपल्या जीवाचे बरे वाईट देखील संतापाच्या भरात होवू शकते याची जाणीव राकेशला झाली होती. त्यामुळे प्रसंगावधान राखत त्याने वर्षाच्या लहान भावाच्या हाताला झटका देत घटनास्थळावरुन पलायन करण्याचा प्रयत्न केला. नाल्यातून पळून जात असतांना तिघांनी मिळून अंधारातच पाठलाग करत त्याला नाल्यातच पकडले.
पळून जाणारा राकेश हाती लागल्याने त्याला सर्वांनी मिळून मारहाण करण्यास सुरुवात केली. राकेशला होत असलेली मारहाण बघून इकडे वर्षाचा जीव वरखाली होवू लागला. त्याला मारु नका, त्याला सोडा अशी विनवणी ती सर्वांना करत होती. दरम्यान वर्साच्या लहान भावाने राकेशला खाली पाडले. तो त्याच्या अंगावरच बसला. आता तो सर्वांच्या चांगलाच तावडीत आला होता. भरत आणि रायसिंग या दोघांनी त्याला घट्ट पकडून ठेवले. त्याच्या अंगावर बसलेला वर्षाचा लहान भाऊ त्याचा गळा दाबून त्याला जीवे ठार करण्याचा प्रयत्न करत होता.
आता राकेशची सुटका नाही असे लक्षात आल्यामुळे वर्षा त्याला सोडून देण्याची विनवणी करत होती. तिच्या विनवणीकडे दुर्लक्ष करत करणने तिला ढकलून दिल्याने ती खाली पडली. सर्व भाऊ वर्षाला समजावण्याचा प्रयत्न करत असल्याची संधी साधून राकेशने तेथून पळून जाण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याला पळून जाण्यात थोडे फार यश येत असल्याचे बघून वर्षाचा लहान भाऊ संतापला. अखेर राकेशच्या जीवनातील तो अखेरचा क्षण समीप आला.
वर्षाच्या लहान भावाने आपल्या कब्जातील गावठी पिस्टल बाहेर काढले. एवढा वेळ बळाचा वापर करणा-या वर्षाच्या अल्पवयीन भावाने गावठी पिस्टलचा वापर करण्याचे निश्चित केले. जीव वाचवण्यासाठी पळून जाणा-या राकेशच्या दिशेने त्याने नेम साधत फायर केले. गोळीबार होताच रात्रीच्या निवांत परिसरात मोठा आवाज झाला. त्या आवाजासह राकेश धाडकन जमीनीवर कोसळला. त्यानंतर वर्षाच्या दुस-या लहान भावाने ते पिस्टल आपल्या हाती घेतले. त्याने देखील एक गोळी राकेशच्या दिशेने झाडली. ती गोळी राकेशच्या डोक्यावर लागली. पहिल्या गोळीत थोडाफार जीव असलेला राकेश जास्त तडफड करु लागला. काही क्षणातच त्याने आपला जीव सोडला.
आपल्या प्रियकराची मृत्यूसोबत सुरु असलेली तडफड आणि त्याने सोडलेला जीव वर्षाने प्रत्यक्ष पाहिला. राकेशने जीव सोडल्याचे बघून वर्षा हळहळ व्यक्त करत होती. आता वर्षाच्या लहान भावाने खिशातील रुमाल काढून त्याचा फास वर्षाच्या गळ्याभोवती आवळला. ती देखील आपला जीव वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करु लागली. मात्र काही वेळातच तिने देखील आपले प्राण सोडले. पळून जावून लग्न करण्याच्या तयारीत असलेले प्रेमीयुगल जीवानिशी ठार झाले होते. राकेश प्रमाणेच वर्षाची देखील हालचाल कायमची शांत झाली होती. राकेश प्रमाणे वर्षा देखील कायमची शांत झाल्याची सर्वांनी खात्री करुन घेतली. त्यानंतर सर्व जण घटनास्थळ असलेल्या नाल्यातून बाहेर येत आपापल्या घरी परतले.
आपण केलेल्या कृत्याचा वर्षाच्या लहान भावाला रात्रभर पश्चाताप झाला. रात्रभर त्याला झोप लागली नाही. अखेर 13 ऑगस्टच्या सकाळीच त्याने गावठी पिस्टलसह चोपडा शहर पोलिस स्टेशन गाठले. गुन्हा करण्यात सहभागी असलेल्या वर्षाच्या भावानेच फिर्यादी होत आपला गुन्हा कबुल केला. त्याच्या फिर्यादीनुसार हे.कॉ. हरिश्चंद्र पवार यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 331/22 भा.द.वि. 302, 323, 504, 34, आर्म अॅक्ट कलम 3/25 नुसार दाखल करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, चोपडा उप विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रावले, चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. अवतारसिंग चव्हाण, पोलिस उप निरीक्षक घनशाम तांबे आदींनी आपल्या सहक-यांसह घटनास्थळ गाठले. दोघांच्या मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकामी उप जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास चोपडा उप विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक ऋषिकेश रावले व त्यांचे सहकारी करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. अवतारसिंग चव्हाण, पोलिस उप निरीक्षक घनशाम तांबे, सहायक फौजदार सुनिल पाटील, हे.कॉ. प्रदीप राजपूत, हे.कॉ. जितेंद्र सोनवणे, संदेश पाटील, किरण गाडीलोहार, पोलिस नाईक ज्ञानेश्वर जवागे, संतोष पारधी, संदीप भोई, महेंद्र साळुंखे, वेलचंद पवार, मधुकर पवार, हेमंत कोळी, पो.कॉ. रविंद्र पाटील, प्रकाश मथुरे आदींचे सहकार्य लाभत आहे. या गुन्ह्याच्या तपासात चौघांसह पाचवा संशयित आरोपी जय कोळी हा देखील निष्पन्न झाला असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे. घटनेच्या वेळी व ठिकाणी जय कोळी हा देखील असल्याचे तपासात आढळून आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रावले करत आहेत. या गुन्ह्यातील मयत वर्षाचे दोघे लहान भाऊ अल्पवयीन आहेत. बाल सुधार गृहात त्यांची रवानगी करण्यात आली असून तुषार कोळी, भरत रायसिंग व जय कोळी यांना अटक करण्यात आली आहे.