मुंबई : शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळणार आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. आतापर्यंत त्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत होता. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. अनेक राज्यांनी त्यांच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता दर वाढवण्यासाठी केंद्राच्या पावलावर पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना सध्या 34 टक्के डीए मिळतो. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.