जळगाव : सिंगापोर येथे प्राध्यापकाची नोकरी मिळण्याच्या आमिषाला बळी पडून जळगाव येथील प्राध्यापकाची 10 लाख 87 हजार 488 रुपयात फसवणूक झाली आहे. कांतीलाल पितांबर राणे (वय 49) असे फसवणूक झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. प्रा. कांतीलाल राणे हे के.एल.विद्यापीठ हैद्राबाद येथे नोकरी करत असून जळगाव शहरातील एम.जे. महाविद्यालय परिसरातील प्रियदर्शनी अपार्टमेंट येथे राहतात.
विविध देशातील विद्यापिठांमधे नोकरी मिळवून देणा-या प्लेसमेंट सेंटर मधून बोलत असल्याचे सांगत काही जणांचे त्यांच्या मोबाईलवर कॉल आले होते. विविध देशांमधील विद्यापिठांमधे आम्ही नोकरी लावून देतो असे त्यांच्याशी पलीकडून फोनवर बोलणा-यांकडून भासवण्यात आले. विविध क्रमांकाच्या चार मोबाइल क्रमांकावरुन आलेल्या कॉलमधे शिल्पा असे नाव सांगणा-या एका महिलेचा त्यात समावेश आहे. फोनवर बोलणा-यांच्या आमिषाला बळी पडून प्रा. कांतीलाल राणे यांची फसगत झाली. राणे यांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने आमिष दाखवणा-यांना पैसे खात्यातून वर्ग केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे व त्यांचे सहकारी करत आहेत.