औरंगाबाद : अॅट्रॉसिटीचा दाखल केलेला गुन्हा मागे न घेतल्याने शेतक-याची हत्या केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनार्दन कोंडिबा कसारे (56), रा. साईनगर, पिसादेवी असे हत्या करण्यात आलेल्या शेतक-याचे नाव आहे. मयत जनार्दन कसारे यांची पत्नी कलाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी महादू औताडे, बाळू महादू औताडे, गिरिजा बाळू औताडे, भरत महादू औताडे, महादू गंगाराम औताडे (सर्व रा. हर्सूल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीस वर्षांपासून मयत जनार्दन कसारे हे पिसादेवी परिसरातील नऊ एकर गायरान जमिनीपैकी आठ एकर जमीन कसत होते. त्यापैकी राहिलेली एक एकर जमीन महादू गंगाराम औताडे यांच्या ताब्यात आहे. दोघांमधे जमीनीचा वाद सन 2008 पासून सुरु झाला होता. पहिल्या वादाच्या वेळी औताडे परिवाराने कसारेंच्या अंगावर धावून जात त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली होती. या घटनेप्रकरणी चिकलठाणा पोलिस स्टेशनला मयत जनार्दन कसारे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या खटल्यात कसारे यांची साक्ष महत्वाची ठरणार होती. तसेच येत्या 11 सप्टेबर रोजी त्यावर सुनावणी होती. त्यापुर्वीच त्यांची हत्या करण्यात आली.