व्यापा-यास मारहाण – अडीच लाखाच्या रकमेसह टोळक्याचे पलायन

जळगाव : उद्योजकाच्या धावत्या कारला मागच्या बाजूने धडक देऊन अपघाताचा बनाव करत सुरुवातीला मदतीची याचना व नंतर चाकूच्या धाकावर मारहाण करत रोख रकमेसह मोबाईल हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 20 ऑगस्टच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी अमित बद्रीप्रसाद अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित बद्रीप्रसाद अग्रवाल यांचा एमआयडीसी परिसरात विनायक ऑईल कार्पोरेशन नावाचा सोया रिफाईंड तेलाच्या होलसेल विक्रीचा उद्योग आहे. 20 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे अमित अग्रवाल हे त्यांचे वडील व कारचालकासह कारने घरी येण्यास निघाले. त्यांच्यासोबत दिवसभराच्या तेल विक्रीचे 2 लाख 49 हजार 800 रुपयांची रोकड होती. वाटेत विज मंडळाच्या सब स्टेशनजवळ एका दुचाकीने त्यांच्या कारला मागच्या बाजूने धडक दिली. या धडकेत कुणाला काही लागले आहे का हे बघण्यासाठी अमित अग्रवाल हे खाली उतरले. त्यावेळी बाजुला एक मोटार सायकल पडलेली असल्याचे त्यांना दिसले. त्या मोटार सायकलजवळ तिन इसम त्यांना दिसले.

तिघांपैकी दोघे त्यांच्याजवळ आले. आम्हाला खुप लागले असून आम्हाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे द्या असे म्हणत त्यांनी पैशांची मागणी केली. वैद्यकीय उपचार करुन देण्याची अग्रवाल यांनी तयारी दर्शवली. मात्र पुढच्याच क्षणी त्यातील एकाने अमित अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना चाकूचा धाक दाखवला. या घटनेत अग्रवाल यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा कारचालक रामेश्वर घुले हा पुढे आला. त्यावेळी त्याने अग्रवाल यांना सोडून कार चालकाच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी देत त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. दुस-याने दरम्यानच्या कालावधीत कारमधील रोख रकमेची पिशवी काढून घेतली.

तेवढ्यात त्याठिकाणी दुस-या मोटार सायकलवर तिन जण अजून आले. रोख रकमेची ती पिशवी नंतर आलेल्या मोटार सायकल स्वाराच्या ताब्यात देण्यात आली. रोख रकमेची पिशवी घेत नंतर आलेल्या मोटार सायकल स्वारांनी तेथून पलायन केले. चाकूचा धाक दाखवणा-याने अग्रवाल यांच्या खिशातील दोन मोबाईल व बॅंकेचे एटीएम कार्ड तसेच चालकाचा मोबाईल घेत पलायन केले. एकुण 2 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल टोळक्याने घेत पलायन केले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधिक्षक डॉ. कुमार चिंता यांनी घटनास्थळाला भेट देत तपासकामी सुचना दिल्या. पुढील तपास स.पो.नि.अमोल मोरे व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here