एटीएम फोडणारी हरियाणा गॅंग निष्पन्न – दोघे ताब्यात

जळगाव : गॅस कटरने एटीएम मशीन फोडून रोकड चोरी करणारी पलवल (हरियाणा) गॅंग जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निष्पन्न केली असून दोघांना अटक केली आहे. या गॅंगकडून जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड आणि कासोदा पोलिस स्टेशनला दाखल एटीएम मशिन फोडण्याचे गुन्हे उघड झाले असून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जामनेर येथिल काही इसम हरीयाणा राज्यात जावून कापसाचा व्यवसाय करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्यादृष्टीने तपासकामी दोन पथकांची निर्मीती करण्यात आली होती. हरियाणा राज्यातील काही इसम जामनेर येथे येवून रहात असल्याचे देखील अधिक तपासात समजले होते.

जामनेर येथील शेख शोएब शेख रफीक रा. मदनी नगर, जामनेर या संशयीतास चौकशीकामी ताब्यात घेत विचारपुस केली असता गुन्ह्याची उकल होण्यास सुरुवात झाली. आमच्याकडे हरियाणा राज्यातील काही इसम येतात. आपल्याला सोबत घेवून त्या इसमांनी जळगाव जिल्ह्यातील नेरी, कासोदा, बोदवड या गावातील एटीएम मशीन गॅस कटरने कापून गुन्हा केल्याची शेख शोएब याने कबुली दिली.

जामनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात 43500 रुपये, कासोदा येथील गुन्ह्यात 9 लाख 55 हजार, बोदवड येथील गुन्ह्यात 31 लाख 10 हजार असे एकुण 41 लाख 8 हजार 500 रुपयांची चोरी केल्याचे त्याने कबुल केले. त्याच्याकडून त्याच्या इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्या माहितीच्या आधारे हरियाणा राज्यातून वारीस उर्फ कालु जलाल खान रा. खिल्लुका ता. हातीन जि.पलवल(हरीयाणा) यास अटक करण्यात आली. अटकेतील दोघांना पुढील तपासकामी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेका अश्रफ शेख, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, दिपक पाटील, विनोद सुभाष पाटील, पोना किशोर राठोड, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, कृष्णा देशमुख, भगवान पाटील, पोकॉ. ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, अशोक पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here