पुर्वीच्या नोकराने टीप देत लुटीचा प्रकार केला सारा;- पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले सर्व आरोपी बारा

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): नोकरीवर ठेवलेल्या कंपनी मालकासोबत काही कारणावरुन बिनसले अथवा वाद झाले तर त्याचा वचपा काढण्यासाठी काही नोकर तयारच असतात. कामावरुन कमी केलेल्या नोकराने साथीदारांच्या मदतीने पुर्वीच्या मालकालाच लुटण्याचा प्रकार घडवून आणला. तेल पॅकींग कंपनीचा मालक माल विक्रीचे 15 ते 20 लाख रुपये रोख स्वरुपात दररोज रात्री घरी घेवून जात असल्याची माहिती पुर्वीच्या नोकराने आपल्या साथीदारांना दिली. त्या माहितीच्या आधारे उद्योजकाला लुटण्याचा कट रचण्यात आला. तो कट यशस्वी देखील झाला. मात्र पोलिसांचे हात एवढे लांब असतात की खाकी वर्दीचा कापड देखील कधी कधी कमी पडतो असे म्हटले जाते. एमआयडीसी परिसरात 20 ऑगस्टच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास उद्योजकास लुटण्याचा प्रकार घडला. हा गुन्हा उघडकीस येण्यास वेळ लागणार नाही असे भाकीत वर्तवण्यात आले होते, ते भाकीत खरे ठरले.

अमीत बद्रीपसाद अग्रवाल हे खाद्य तेल पॅकींग कंपनीचे मालक आपल्या वडीलांसह त्यांच्या कारने 20 ऑगस्ट रोजी रात्री घरी जात होते. वाटेत विज वितरण सब स्टेशनजवळ त्यांच्या कारला एका ट्रिपल सिट मोटार सायकलस्वाराने धडक दिली. अपघात झाल्याचा बनाव करुन त्याने अमित अग्रवाल यांना वैद्यकीय उपचारासाठी पैशांची मागणी केली. पुढच्याच क्षणी त्याने चाकूचा धाक दाखवत दम देण्यास सुरुवात केली. कारचालक रामेश्वर घुले याने विरोध केला असता तिघांपैकी एकाने त्याला चाकूचा धाक दाखवत त्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता.

दरम्यान एकाने कारच्या पाठीमागील सिटवर ठेवलेली रोख रकमेची कापडी पिशवी जबरीने काढून घेतली. त्या पिशवीत 2 लाख 49 हजार 800 रुपये होते. त्याच वेळी अजून तिन तरुण त्याठिकाणी आले. अगोदरच्या तरुणांकडून ती पिशवी नंतर आलेल्या तरुणांनी आपल्या ताब्यात घेत तेथून पलायन केले होते. तसेच अपघात घडवून आणणा-या तिघांनी चाकूच्या धाकावर अमित अग्रवाल यांचे 20 आणि 15 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, एटीएम व पॅन कार्ड देखील काढून घेतले होते. या घटनेप्रकरणी एकुण 2 लाख 85 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी लुट झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक डॉ. कुमार चिंथा व एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिली. एमआयडीसी पोलीसांनी लागलीच या गुन्हयाचा तपास सुरु केला. सदरचा गुन्हा उमाळा येथील काही तरुणांनी केला असल्याची माहीती तपासाअंती मिळाली. लुटारु नेरीच्या दिशेने गेले असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली.

त्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.ना किशोर पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, मुकेश पाटील, दिपक चौधरी, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे, चालक इम्तीयाज खान आदींचे पथक नेरी गावाच्या दिशेने रवाना झाले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नेरी येथील हॉटेल मोहीनी येथून शुभम ज्ञानेश्वर जाधव (22) रा. जाधव गल्ली, उमाळा – जळगाव, प्रथमेश गंगाधर कोलते (19) रा. हनुमान मंदीराजवळ, उमाळा – जळगाव, व एक अल्पवयीन अशा तिघांना पथकाने ताब्यात घेतले.

त्या तिघांकडून गुन्हयात वापरलेली बजाज प्लसर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. या तिघांचा या गुन्हयात सहभाग असल्याचे चौकशी व तपासाअंती निष्पन्न झाले. ताब्यातील तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लुटीत सहभाग असलेल्या दिपक गजानन मोहीते, रा. उमाळा – जळगाव, उमेश रमेश मोहीते रा. कुसुंबा गोशाळेच्या मागे, जळगाव, तेजस संतोष इंगळे, रा. सुरेशदादा जैन नगर, कुसुंबा – जळगाव, कृष्णा रविंद्र पारधी, रा. कुसुंबा – जळगाव यांची नावे पुढे आली. या सर्वांना देखील शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून देखील गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल तपासकामी जप्त करण्यात आली. अधिक सखोल तपासात या गुन्ह्यात सद्यस्थितीत एकुण सहा आरोपी व एक अल्पवयीन असे एकुण सात जण पोलिसांनी ताब्यात घेतले असून अजून पाच आरोपी अटक करण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यांना देखील लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

लुट करण्यात आलेले अमित अग्रवाल यांच्याकडे यापुर्वी कामाला असलेला तेज संतोष इंगळे हा या कटाचा सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानेच टीप दिल्यामुळे हा लुटीचा प्रकार घडला. कंपनी मालक अग्रवाल हे दररोज रात्री 15 ते 20 लाख रुपये नेतात अशी टीप तेज इंगळे याने त्याच्या साथीदारांना दिली होती. त्यानुसार कट व सापळा रचून हा गुन्हा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

सदर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी एमआयडीसी पोलीसांचे अभिनंदन केले आहे. रात्रीच्या वेळी रोख रक्कम नेतांना सावधानता बाळगण्याचे आवाहन त्यांनी जनतेला या माध्यमातून केले आहे. अटकेतील आरोपींना न्या. जे. एस. केळकर यांच्या समक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 25 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. अमोल मोरे व त्यांचे सहकारी पोहेकॉ रतीलाल पवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here