जळगाव : कंपनीत डेप्युटी डायरेक्टरचे पद देण्याचे आमिष दाखवत सहा लाख रुपयात फसवणूक करणा-या फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. गोपीकिशन ओमप्रकाश जांगीड असे राजस्थान येथील रहिवासी असलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून गेल्या अकरा वर्षापासून गोपीकिशन फरार होता. त्याला एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
कमलाकर एकनाथ बडगुजर यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला सन 2011 मधे फिर्याद दाखल केली होती. गोपीकिशन जांगीड या फरार आरोपीने कमलाकर बडगुजर यांना कंपनीत डेप्युटी डायरेक्टर पद देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला कमलाकर बडगुजर बळी पडले होते. गोपीकिशन याने बडगुजर यांच्यासह पत्नी व मुलांच्या नावे एकुण सहा लाख गुंतवण्यास भाग पाडले होते. सहा लाख मिळाल्यानंतर गोपीकिशन फरार झाला होता.
या गुन्ह्यात पवन मनोहर पाटील, कु. प्रज्ञा पवार, विनोद हिलाल पाटील, गोपीकिशन जांगीड व अन्नपुर्णा पाटील अशा एकुण पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. यापैकी विनोद पाटील हा अद्याप फरार आहे. गेल्या अकरा वर्षापासून फरार असलेला गोपीकिशन जांगीड यास पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे यांच्यासह हे.कॉ. अलताफ पठाण व सचिन मुंडे आदींनी महाबळ परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी व संदीप धनगर करत आहेत.