मारेगाव (यवतमाळ) : तीन वर्षांच्या बाळाला पोटास बांधून मातेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना यवतमाळ तालुक्याच्या म्हैसदोडका या गावी दुपारी घडली.
मोनाली लक्ष्मण पारखी (२९) व जय लक्ष्मण पारखी (३) अशी मयतांची नावे आहेत. आज सकाळी अकराच्या सुमारास मोनाली पारखी ही महिला आपल्या बाळासह शेतात जात असल्याचे सांगत घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर गावापासून काही अंतरावर असलेल्या बोधाने यांच्या शेतातील विहिरीत मोनालीने आपल्या लहान बाळासह विहिरीत उडी घेतली.
आत्महत्येपूर्वी मोनालीने मारेगाव येथे आपल्या पतीला आपण मुलासह बोधाने यांच्या विहिरीत आत्महत्या करत असल्याचे फोनवरून कळवले. त्यानंतर तिने आत्महत्या केली. याबाबत तिच्या पतीने आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळ गाठले.
तोपर्यंत दोघे पाण्यात बुडून मृत्यू पावले होते. मारेगाव पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली. मोनालीच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार व पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करत आहेत.