नाशिक : मालेगाव शहरात लॉकडाऊन काळात कर्तव्यावर असलेल्या तब्बल 175 पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. या कर्मचारी वर्गाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने नाशिक ग्रामिण पोलिस दलात समाधानाचे वातावरण पसरले आहे. मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असले तरी पोलिस अधिकारी व कर्मचारी आपला जिव धोक्यात घालून कर्तव्य बजावत होते व बजावत आहेत.
कोरोना बाधीत पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचाराअंती तब्बल 175 कोरोनाबाधीत कर्मचा-यांनी या आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे.
कोरोनामुक्त पोलीस योद्ध्यांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे 90 पोलीस, जालना एस.आर.पी.एफ.चे 39 पोलीस, औरंगाबाद एस.आर.पी.एफ. चे 10, अमरावती एस.आर.पी.एफ.चे 13, धुळे एस.आर.पी.एफ. 2, मरोळ आणि धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे 2, जळगाव पोलीस दलातील 4 आणि मुंबई रेल्वे पोलीस 15 असे एकुण 175 पोलीसांनी कोविड-19 या कोरोना आजारावर मात करत बरे झाले आहेत. सद्यस्थितीत एकुण 06 कोरोनाबाधीत पोलीस कर्मचारी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. ब-या झालेल्या सर्व कर्मचा-यांचे नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग यांनी अभिनंदन केले आहे. बरे झालेले सर्व कर्मचारी नव्या जोमाने व उमेदीने पुन्हा कामावर हजर झाले आहेत.