जळगाव : कोरोनाचा कहर संपून सर्व जनजीवन सुरळीत झाल्यानंतर देखील जळगाव शहर जुने बस स्थानक ते कवयित्री बहिणाबाई उ.म.विद्यापिठ येथे जाण्यासाठी व परत येण्यासाठी सिटी बसेस अद्याप बंदच होत्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात शिक्षण घेण्यासाठी जाणा-या व येणा-या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल बसेस बंद असल्यामुळे सुरु होते. विद्यार्थ्यांना नाईलाजाने रिक्षाने जीव मुठीत धरुन आर्थिक झळ सोसून प्रवास करावा लागत होता.
या समस्येची माहिती सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पाठपुरावा सुरु केला. या समस्येचे निराकरण होण्यासाठी त्यांनी एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेवून निवेदन दिले होते. उ.म.वि. त शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शहर बसेस पुर्ववत सुरु करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती
सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या पाठपुराव्याची दखल घेत उ.म.वि.ला जाणा-या व येणा-या बसेस सुरु करण्याचे विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. या पत्राची एक प्रत गुप्ता यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.