मोबाईलचा वाद वाढल्याने जमली तरुणांची टोळी– चाकूच्या घावात अक्षयच्या जीवाची झालीच होळी

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): अन्न, वस्त्र, निवारा, वाहन आणि मोबाईल हे पाच घटक आजच्या कलीयुगात मानवी जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक झाले आहेत. आजकाल प्रत्येकाच्या हातात अथवा खिशात अ‍ॅंड्रॉईड मोबाईल असतो. अशिक्षीत तरुणांना देखील मोबाईलमधील विविध अ‍ॅप आणि फंक्शन गरजेनुसार कमी अधिक प्रमाणात समजू लागले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून तरुण वर्गाची डिजीटल इंडीयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. बरेच व्यवहार पार पाडण्यासाठी अ‍ॅंड्रॉईड मोबाईलची गरज भासते. सरकारने तशी गरजच निर्माण केली आहे. “कौन बनेगा करोडपती” या छोट्या पडद्यावरील शो मधे अमिताभ बच्चन विजेत्या स्पर्धकाला त्याने जिंकलेली बक्षीसाची रक्कम मोबाईलच्या माध्यमातून त्याच्या खात्यात जमा झाल्याचे दाखवत असतात.

साधारण विस वर्षापुर्वी मोबाईल बाळगणा-या दोन पोलिस कर्मचा-यांना जळगावच्या तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी निलंबीत केले होते. त्या काळात केवळ कॉलींगसाठी मिळणारा साधा आणी अवजड मोबाईल बाळगणे दोन पोलिस कर्मचा-यांसाठी जणू काही गुन्हा ठरला होता. आज जमाना बदलला आहे. नवनवीन फिचर असणारे मोबाईल हे एक दुधारी शस्त्र देखील बनल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. वापरण्यास दिलेला मोबाईल खराब केल्याच्या कारणावरुन एकाची हत्या झाल्याची घटना जळगाव शहरात घडली.

अमरसिंग ओंकार चव्हाण आणि प्रदीप ओंकार चव्हाण हे दोघे मोलमजुरी करणारे भाऊ जळगाव शहरातील नंदनवन कॉलनीत राहतात. या दोघा भावांचा निलेश पवार हा मित्र आहे. अमरसिंग आणि प्रदिप या दोघा भावांच्या अडीअडचणीत निलेश हा धावून जाणारा मित्र म्हणून ओळखला जात होता.

गणेश चव्हाण आणि प्रदीप चव्हाण हे दोघे मोलमजुरी करणारे मित्र एकमेकांना परिचीत होते. प्रदिपकडे अ‍ॅंड्राईड मोबाईल होता. प्रदीपकडे असलेला मोबाईल गणेशने काही दिवसांसाठी वापरण्यास मागितला होता. गणेशची गरज आणि अडचण लक्षात घेत माणूसकीच्या नात्याने प्रदीपने गणेशला मोबाईल वापरण्यास दिला. काही दिवसांनी गणेशने प्रदीपला त्याचा मोबाईल परत केला मात्र तो खराब झालेला होता. त्या मोबाईलचा डिस्प्ले खराब झालेला होता. डिस्प्ले दुरुस्त करण्यासाठी येणारा खर्च प्रदीप यास पेलवणारा नव्हता. मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यामुळे प्रदीपची मोबाईलवरील सर्वच कामे खोळंबली. कुणाचा कॉल आला ते त्याला समजत नव्हते. डिस्प्लेच नसल्यामुळे एकंदरीत सर्व कामे खोळंबल्याने प्रदीप मनातून नाराज होत गणेशवर चिडला होता. मोलमजुरी करणा-या प्रदीपला गणेशचा प्रचंड राग आला होता. तो गणेशला मोबाईल दुरुस्तीचे पैसे मागत होता. मात्र जवळ पैसे नसल्यामुळे गणेश त्याला मोबाईल दुरुस्तीचे पैसे तात्काळ देवू शकत नव्हता. त्यातून दोघात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली होती.

mayat akshay chavhan

21 ऑग़स्ट रविवारचा दिवस उजाडला. रविवारच्या दिवशी मोलमजुरी करणा-या तरुणांना मद्यपानाची आठवण येत असते. जळगाव शहरातून जाणा-या महामार्गालगत गणेश कॉलनी नजीक असलेल्या मधुशाळेत अर्थात दारुच्या अड्ड्यावर सर्व मजूर त्यांच्या आवडी आणि सवडीनुसार मद्यपानासाठी येत असतात. प्रदिप आणि गणेश या दोघांचा मद्यपान हा सामायीक विषय गणेश कॉलनी स्टॉपवरील मधुशाळेत मार्गी लागत असे. या विषयाची पुर्ती करण्यासाठी दोघांची याठिकाणी हमखास हजेरी लागत असे. रविवार 21 ऑगस्ट रोजी दोघे मद्यपानाच्या निमित्ताने एकत्र आले होते. गणेश दिसताच प्रदीपच्या संतापाचा पारा चढला. मोबाईल दुरुस्तीसाठी लागणा-या खर्चाची तो गणेशला मागणी करु लागला. बघता बघता दोघांमधे वादाची ठिणगी पडली.

शब्दामागे शब्द वाढत जावून दोघांमधे हाणामारी सुरु झाली. आपल्याला होत असलेली मारहाण बघून गणेशने त्याचा मित्र शैलेश सुभाष राठोड यास फोन करुन बोलावून घेतले. फोनवर माहिती मिळताच शैलेश राठोड याच्यासह अक्षय अजय चव्हाण, आणि युवराज जाधव असे घटनास्थळी धावून आले. सुरुवातीला गणेशची बाजू घेत अक्षय चव्हाण याने प्रदीप चव्हाण यास समजावण्यास सुरुवात केली. मात्र मोबाईल दुरुस्तीसाठी लागणा-या खर्चाची मागणी करण्याचा हेका प्रदीपने लावून धरला होता. त्यामुळे गणेशच्या मदतीसाठी धावून आलेल्या शैलेश राठोड, अक्षय चव्हाण आणि युवराज जाधव या तिघांनी प्रदीपला धक्काबुक्की सुरु केली.

दरम्यान प्रदीपच्या बाजूने त्याचा भाऊ अमरसिंग आणि मित्र निलेश पवार एकत्र आले. दोन गट आमनेसामने भिडले. दरम्यान गणेशच्या बाजूने असलेल्या अक्षयने प्रदीपचा भाऊ अमरसिंग यास दगड फेकून मारला. दगडाच्या घावाने अमरसिंग याच्या डोक्याला जखम झाली. आपला मित्र अमरसिंग यास अक्षयने दगड मारल्याचे बघून निलेश पवार चिडला. त्याने आपल्या कब्जातील चाकू बाहेर काढला. त्या चाकूने त्याने अक्षय चव्हाण याच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. चाकूचे सपासप वार झाल्यामुळे अक्षय चव्हाण गंभीर जखमी झाला. जखमी अक्षयचा बचाव करण्यासाठी त्याचा मित्र युवराज जाधव धावून आला. युवराज जाधव मधे आल्याचे बघून निलेशने त्याच्यावर देखील चाकूचे घाव घालण्यास सुरुवात केली. चाकूचे पाठीवर घाव बसल्याने युवराज हा देखील जखमी झाला.

दोघे जखमी झाल्याचे बघून अमरसिंग, निलेश आणि त्यांचे इतर मित्र सर्वच जण घटनास्थळावरुन पळून गेले. या खूनी हल्ल्याची घटना घडत असतांना परिसरात एकच हल्लकल्लोळ माजला. परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती सर्व प्रथम जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर यांना समजली. पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर यांची या घटनेच्या दिवशी रविवारी सुटी होती. याच दिवशी त्यांचा वाढदिवस देखील होता. घरात त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असतांना त्यांना सर्वप्रथम या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांच्यातील पोलिस अधिका-याचे कर्तव्य जागे झाले. त्यांनी वाढदिवस आणि सुटी बाजूला ठेवत अंगावर वर्दी चढवली. तात्काळ दुचाकीला किक मारुन त्यांनी घटनास्थळ गाठले.

घटनास्थळावर अक्षय चव्हाण हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी लागलीच जबर जखमी असलेल्या अक्षय चव्हाण याच्यासह युवराज जाधव अशा दोघांना सामान्य रुग्णालयात रवाना करण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता तसेच पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना घटनेची माहिती दिली. आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर यांचे सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी आभार व्यक्त केले.

सामान्य रुग्णालयात अक्षय अजय जाधव यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. जखमी युवराज जाधव याच्यावर उपचार करण्यात आले. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे आदींनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आणि घटनाक्रम शैलेश राठोड याच्याकडून समजून घेतला.  मयत अक्षय चव्हाण याचा भाऊ शैलेश अजय चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला निलेश उर्फ बाळा पवार (मुळ रा. कुसुंबे ता. रावेर, सध्या रा. रिंगरोड जळगांव) आणि अमरसिंग ओंकार चव्हाण (रा. नंदनवन कॉलनी, जळगांव) तसेच इतर नाव गाव माहिती नसलेल्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5, गु.र.नं. 528/2022, भा.द.वि. 302, 307, 504, 506, 34 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील जखमी संशयीत आरोपी अमरसिंग हा पोलिसांच्या निगराणीखाली सामान्य रुग्णालयात उपचार घेत होता. तर चाकूहल्ला करणारा निलेश उर्फ बाळा पवार हा फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते.

फरार असलेला निलेश प्रविण पवार (रा. रिंग रोड जळगाव) हा शिरसोली येथे लपून बसला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, जितेंद्र राठोड, समाधान टहाकळे, शुद्धोधन ढवळे, इमरान सय्यद, किशोर पाटील, राकेश बच्छाव, मुदस्सर  काझी तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सलीम तडवी, रविंद्र साबळे, जुबेर तडवी, अमित मराठे आदींनी त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. या पथकाने शिरसोली येथील जंगलात लपून बसलेल्या निलेश पवार यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपासकामी अटकेतील निलेश पवार यास जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस उप निरीक्षक गणेश देशमुख, हे.कॉ. अनिल झुंजारराव, पो.कॉ. योगेश साबळे, समाधान पाटील, सलीम शेख, पहुरकर यांचे सहकार्य लाभले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार व त्यांचे सहकारी करत आहेत. या गुन्ह्याकामी पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here