भारताच्या राजकीय पक्षांच्या इतिहासात “कॉंग्रेस” हाच भिष्माचार्यांच्या वयाचा पक्ष. टिळक, गांधी, नेहरु युगातून वाटचाल केलेला हा पक्ष. या पक्षाच्या स्थापनेपासून सामुहिक नेतृत्व “जहाल मतवादी – मवाळ मतवादी विचारप्रवाह इथे सामुहिकपणे नांदले. महात्मा गांधीजींप्रमाणे सरदार पटेल जनतेच्या स्मरणात राहिले. नेहरु यांच्यानंतर लाल बहादुर शास्त्री, इंदीरा गांधी जनतेच्या दिर्घ स्मरणात आहेत. बलाढ्य अशा कॉंग्रेस पक्षाची संघटना कॉंग्रेस आणि इंदीरा कॉंग्रेस अशी दोन शक्ल झाली. तेव्हापासून या पक्षाचे नेतृत्व वैचारीक झुंजीत उतरलेले काही पिढ्यांनी पाहिले.
परवाच कॉंग्रेसमधे पन्नास वर्ष राहिलेले गुलामनबी आझाद यांनी पक्ष सोडला. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाच्या आणि या पक्षातल्यांच्या जखमा ताज्या झाल्या. कॉंग्रेस – जनता पक्ष – भाजपा आणि शिवसेना या चार राजकीय पक्षांची राजकीय वाटचाल पाहिली तर प्रत्येकात “सत्तेचा मुकुट” डोईवर चढताच “अहं ब्रम्हासी” (मीच ब्रम्ह, मीच सर्वश्रेष्ठ) हा समान धागा आढळतो. यापैकी काही पिढ्यांना वारसाहक्काने पक्ष आणि त्याचे नेतृत्व लाभले.
काळ बदलला. विचारांची जागा व्यवहाराने घेतली. साधन शुचिता सुविचाराची जागा धनसंपदा, मसल पॉवरने घेतली. स्वातंत्र्यानंतर मुस्लीम तुष्टीकरणाची विचारधारा मागे पडली. “वारा वाहील तशी पाठ फिरवावी” हा मंत्र फक्त कार्यकर्त्यांपुरता उरला. कॉंग्रेस पक्षाचे आजचे नेतृत्व तपासले तर तिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोन मोठ्या प्रतिमा दिसतात. त्यातही विरोधाभास आहे. पक्षाचे नेतृत्व उघडपणे स्विकारणे, नाकारणे, दुस-याकडे सोपवणे यापैकी काहीही निर्णय न देता भिजत घोंगडे तसेच पडू दिले जाते. तोंडात मिठाची गुळणी धरुन पक्ष पन्नास टक्के मरण पावला तरी उरलेला पन्नास टक्के आमचा हिस्सा असे म्हणून मंडळी समाधान मानते. शिवाय सर्वत्र लोकशाहीचा गजर करायचा. प्रत्यक्षात पक्ष नेतृत्वाला प्रश्न विचारण्याचा अधिकार मात्र कुणालाच नाही असं वर्तन ठेवायचे हाच खाक्या प्रत्येक राजकीय पक्षात आहे.
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व विदेशी की स्वदेशी? हा वाद मध्यंतरी गाजला. स्वदेशी – विदेशीचा प्रश्न विचारणा-यांना पक्षाबाहेर काढण्यात आले. आणखी काहींच्या नांग्या ठेचण्यात आल्या. ज्यांच्याकडे उद्याच्या आशेने बघायचे असे युवराज संसदेत मोदीजींच्या गळ्यात पडल्याचे दिसून आल्याने मध्यंतरी खळबळ माजली. अनेकांना हा अत्यंत बालिशपणा वाटला. ज्यांच्याशी तुमचा राजकीय पंगा ठरलेला त्यांच्याच गळ्यात पडून पोरकटपणा दाखवणा-यांवर कार्यकर्ते कसा विश्वास ठेवणार? विरोधकाशी लढायचे तर तुमची शस्त्रे कोणती? वैचारिक भुमिका काय? थिंक टॅंक आहे का? की निव्वळ “मेरी सुनो!”. पक्षाच्या नेतृत्वपदी पोचणारे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, बधत नाहीत. त्यांच्याकडे पक्ष निधीच्या थैल्या घेऊन येणारे उद्योगपतींचे मुनीमजी, कंत्राटे मिळवण्याच्या बदल्यात काळ्या थैल्या घेवून येणारे ठेकेदार यांना मात्र मुक्त प्रवेश असतो. त्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता त्याच्या विश्वासू हस्तक “मुनीमजी” म्हणून नेमतो. त्यांना भेटा, आणलेली कोट्यावधीची भेट तिथे ठेवा. तुमचे काय सांगा (मग ते कंत्राट, पक्षाचे तिकीट, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद वगैरे)
भल्या मोठ्या आकाराच्या थैलीछाप गोड भेटीसोबत प्रचंड आज्ञाधारकपणा (लाळघोटेपणा-चापलुसी) सभ्य भाषेत विनम्रता ही गुणवत्ता समजली जाते. कॉंग्रेस पक्षापुरते पाहीले तर सन 1950 ते 1985 पर्यंत धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलॅरिझमचा दांडगा प्रभाव राहिला. त्या प्रभावाची फळे म्हणून गुलाम अली आझादांपासून अनेकांना केंद्रीय मंत्रीपदे, मुख्यमंत्रीपदे, पंतप्रधान पदापर्यंत मजल मारता आली.
इंदीराजींच्या इच्छेनुसार जम्मू काश्मीरचे गुलाम आझाद महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेले. अर्थात त्याकाळी त्यांना जवाहरलाल दर्डा यांच्या नागपुरी स्टाईलच्या बलदंड राजकारणाची साथ लाभली. तसे नसते तर आरएसएसच्या प्रभाव क्षेत्रात तेव्हाच आझाद पालापाचोळ्यासारखे उडून गेले असते असे म्हणतात. हे खरे वाटत नसेल तर आताच्या वातावरणात आझाद यांनी नागपूर, पुणे, लखनौ अस कुठूनही लोकसभेवर जिंकून दाखवावे. आज तरी अस अशक्य धाडस ते करणार नाही.
धर्मनिरपेक्षतावादी विचारप्रवाहांची पुंजी संपलेली, वारसा हक्कात मिळालेला कॉंग्रेसपक्ष पदाचा हक्क सोडवेना म्हणून विदेश वाल्या तर कधी प्रकृती कारणास्तव विदेशात जाणारे नेतृत्व देशात राहूनही भेटी टाळतय. संपुर्ण पानगळ झाल्याचं कोरडठाक बनलेला वटवृक्षापासून आशा ती कसली उरली नाही. बदललेल्या पक्षास पन्नास खोकी, आठशे खोकी, हजार दोन हजार खोकी अशा वादळवारा झंझावात बनून खुणावत असल्याने व्यावहारिक विचार प्रबळ न बनल्यासच नवल म्हणायचे. आपण भाजपात जाणार नाही. नवा राजकीय पक्ष काढू असे आझाद म्हणताहेत. ते मोठे नेते आहेत. पण त्यांना आजवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीपद आता हवे असेल तर कोठून मिळू शकतं? तशी महाशक्ती कुठे आहे? त्याच महाशक्तीच्या कृपा प्रसादाने त्यांचा महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे पवित्र कायापालट झालाय का? ते लवकरच दिसेल. तोवर प्रतिक्षा करुया!