जळगाव : मनुष्याची गरज हेरुन, त्याला त्याच्या गरजपुर्तीचे गोड गाजर दाखवत मोहजालात फसवून आपला उल्लू साध्य करणारे भामटे या जगात जागोजागी टपून बसले आहेत. मोहजालात अडकण्यापासून पावलोपावली सावध राहणे आवश्यक असल्याचे भुसावळ शहरात घडलेल्या फसवणूकीच्या एका घटनेतून पुन्हा एकवेळा दिसून आले आहे. कर्ज देण्याचा बहाणा करणा-या भामट्यांनी एक लाखाच्या असली नोटा स्विकारुन ठरलेले दहा लाख देत असल्याचे भासवून 5 हजार वगळता इतर सर्व नोटा चिल्ड्रन बॅंकेच्या देत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
विना तारण, विना कागदपत्र शैक्षणिक कर्ज हवे आहे का? अशा स्वरुपाची फेसबुकवरील जाहीरात कल्याण पश्चिम येथील रहिवासी तथा लेबर कॉंन्ट्रॅक्टर मंगेश वाडेकर यांच्या वाचण्यात आली होती. त्या जाहीरातीला वाडेकर यांच्याकडून प्रतिसाद मिळताच ती फसवी जाहीरात देणारे विकास म्हात्रे व राजेश पाटील ही जोडगोळी सक्रीय झाली. दोघांनी मंगेश वाडेकर यांचा सपाटून पाठपुरावा सुरु केला. आपणास विनातारण, विना कागदपत्र दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सतत फोनवर बोलून दोघांनी कल्याण येथील रहिवासी मंगेश वाडेकर यांना गळ घातली. मात्र एक लाख रुपये रोख स्वरुपात आम्हाला भुसावळ येथे प्रत्यक्ष येवून द्यावे लागतील वाडेकर यांना अट घालण्यात आली.
अखेर दोघांच्या बोलण्याला आणि मोहाला बळी पडून वाडेकर तयार झाले. त्यांनी आपल्या वाहनाने भुसावळच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले. वाटेत पारोळा येथील स्टेट बॅंकेतून त्यांनी दोघांना देण्यासाठी एक लाख रुपये काढले. ते एक लाख रुपये सोबत घेत त्यांनी मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी भुसावळ गाठले. फोनवर संभाषण झाल्याप्रमाणे भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात वाडेकर आले. दोघा भामट्यांनी सर्वप्रथम वाडेकर यांच्या ताब्यातील एक लाख रुपये घेण्याचे काम केले. एक लाख रुपयांची रक्कम हातात पडताच विकास म्हात्रे व राजेश पाटील नाव सांगणा-या दोघांनी एक बॅग वाडेकर यांच्या हातात सोपवली. या बॅगेत कर्जाचे दहा लाख रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पाचशे रुपयांच्या नोटांचे प्रत्येकी एक लाखांचे एकुण दहा बंडल असे दहा लाख रुपये असल्याचे वाडेकर यांना भासवण्यात आले. त्यांच्या बोलण्यावर आणि दिलेल्या रकमेवर विश्वास ठेवत जास्त वेळ न दवडता वाडेकर यांनी पारोळा मार्गे कल्याणच्या दिशेने आपल्या कारने मार्गक्रमन सुरु केले.
सायंकाळी सात वाजता पारोळा शहरात त्यांनी नोटांची पाहणी केली असता प्रत्येक बंडलातील पहिली नोट खरी व आतील सर्व नोटा मुलांच्या खेळण्यातील नकली नोटा असल्याचे उघड झाले. एक लाख रुपये देवून आपल्याला केवळ पाच हजार रुपयांच्या असली नोटा मिळाल्याचे वाडेकर यांच्या लक्षात आले. आपली एकुण 95 हजार रुपयात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पारोळा पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. फसवणूकीचे घटनास्थळ भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत असल्यामुळे वाडेकर व त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा व त्याचा मित्र अशा तिघांनी भुसावळ बाजरपेठ पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना सर्व आपबिती त्यांनी कथन केली. वाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला विकास म्हात्रे आणि राजेश पाटील या दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासणीत नोटा देणारा आढळून आला. पुढील तपास सुरु आहे.