जळगाव : फायनान्स कंपनीतील 247 सदस्यांच्या नावे बायोमॅट्रीक्स पद्धतीने थंब घेत कर्ज मंजूर करुन घेत सुमारे 66 लाख रुपये परस्पर उचल करुन घेतल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत फायनान्स इंक्ल्युजन लिमीटेड नावाच्या फायनान्स कंपनीची शाखा मुक्ताईनगर येथे आहे. या शाखेत फिल्ड असिस्टंट म्हणून कार्यरत असलेले निखील राजेंद्र सावकारे (रा. राज शाळेजवळ एमडीएस कॉलनी जळगाव) यांच्यासह अवधूत ज्ञानेश्वर सोनवणे (रेलगाव फुलंब्री जि. औरंगाबाद), पंकज रामधन वानखेडे (रा. शेळगाव मुकुंद ता. चिखली जि. बुलढाणा) अशी या गुन्ह्यातील संशयीत आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी संगनमताने कंपनीतील सदस्य असलेल्या 247 जणांचे बायोमॅट्रीक्स पद्धतीने कर्ज मंजूर करून घेतले. त्यांचे थंब इम्प्रेशन घेवून कर्ज वितरण केल्याचे भासवून 66 लाख 66 हजार 924 रुपयांची परस्पर उचल करुन घेतल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाखा व्यवस्थापक एकनाथ भिमराव गोसावी रा. चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत.