अमरावती : अमरावती येथील एका तरुणीचे अपहरण करण्यात आले असून तिचा बळजबरी आंतरधर्मीय विवाह लावून देण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी राजापेठ पोलिस स्टेशन अधिका-यांना विचारणा करण्यासाठी फोन केला. आपला फोन कॉल रेकॉर्ड करण्यात आला असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. आपला कॉल रेकॉर्ड का केला याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राजापेठ पोलिस स्टेशन गाठत अधिका-यांसमवेत शाब्दिक खडाजंगी केली.
अमरावती येथील एका वीस वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आले असून तिचा बळजबरी विवाह करण्यात आला असल्याचा आरोप राणा यांनी यावेळी केला. त्या तरुणीला शोधून तिला तिच्या परिवाराच्या ताब्यात देण्याची मागणी त्यांनी केली. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तो माहिती देण्यास तयार नसल्याचा आरोप देखील राणा यांनी केला आहे. आपला कॉल पोलिसांनी ध्वनीमुद्रीत का केला याबाबत देखील त्यांनी प्रश्न केला. पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याशी त्यांनी याबाबत विचारणा केली. अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचा लवकरात लवकर शोध लागला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.