जळगाव : जळगाव शहरातील राज वाईन शॉप या मद्य विक्रीच्या दुकानावर मुदतबाह्य बिअर विक्री तसेच मुदतबाह्य बिअरचा साठा आढळून आल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
रामेश्वर कॉलनी परिसरात असलेल्या राज वाईन शॉप येथून काही तरुणांनी बिअर खरेदी केली होती. बिअर प्राशन केल्यानंतर त्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. उलटी झाल्यानंतर बिअरच्या बाटलीवरील एक्सपायरी डेट तपासली असता ती बाटली मुदतबाह्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे पथक दुकानात आले. दुकानाची तपासणी केली असता अमस्टल बिअरच्या 124 बाटल्या आणि 500 एम.एल.चे दहा टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भरारी पथकाने पंचनामा केल्यानंतर त्या बाटल्या जप्त केल्या आहेत.