लाचेची मागणी भोवली ; नंदुरबार एसीबी ची कारवाई- कनिष्ठ अभियंता व ग्रामसेवकास एसीबीच्या जाळ्यात

ACB-Crimeduniya

नंदुरबार : ग्रामपंचायत रस्ता कॉक्रिटीकरणाच्या कामाचा चेक काढून देण्याकामी लाचेची मागणी करणा-या शहादा पं.स. बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास महागात पडले. लाच मागणा-या अभियंत्यासह त्याला प्रोत्साहन देणारा ग्रामसेवक असे दोघे जण आज एसीबीच्या जाळ्यात अडकले.

या प्रकरणातील मूळ तक्रारदाराने सन 2018 -19 या कालावधीत टेंभर्ली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत होळ गुजरी ग्रामपंचायतीच्या रस्ता काँक्रीटीकरणाचे काम घेतले होते. जनसुविधा 2515 या योजनेअंतर्गत असलेल्या या कामाचे निविदा मुल्य रुपये 9,99,000 एवढे होते. हे काम टेंभर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले होते. मुळ एजन्सीने हे काम तक्रारदारास सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिले होते. तसा करारनामा करण्यात आला होता. हे काम डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण झाले होते. या कामाचा 8,05,200 रुपयांचा चेक टेभर्ली ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद नंदूरबार यांनी मार्च महिन्यात वर्ग केला होता. मात्र ही रक्कम न मिळाल्याने तक्रारदाराने कनिष्ठ अभियंता राजेश पाटील व ग्रामसेवक प्रविणसिंग गिरासे यांना विचारणा केली होती.

या कामाचा चेक काढून देण्यासाठी अभियंता राजेश पाटील यांनी तक्रारदाराकडे 24,000 रुपयांची लाच मागीतली होती. त्याकामी ग्रामसेवक प्रविणसिंग गिरासे याने अभियंता राजेश पाटील यास प्रोत्साहन दिले. या प्रकरणी तक्रारदाराने नंदुरबार एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सापळा रचून दोघा लाचखोरांना लाचेची मागणी करतांना अटक करण्यात आली. तपासाअंती दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई पोलिस उप अधिक्षक शिरिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.जयपाल अहिरराव व त्यांचे सहकारी हे.कॉ. उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, पोलिस नाईक दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, महिला पोलिस कर्मचारी ज्योती पाटील आदींनी पुर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here