जळगाव : अंगणात एकटी बसलेल्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी मासे विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर अशोक भोई रा. नगरदेवळा असे संशयीत मासे विक्रेत्याचे नाव आहे.
पारोळा तालुक्यातील शिरसमणी गावी 2 सप्टेबर रोजी सदर पिडीत विवाहिता अंगणात एकटी बसली होती. त्यावेळी शंकर भोई हा मासे विक्रेता तिच्याजवळ आला. त्याने तिला मासे विकत घेण्यासाठी गळ घातली. नेहमी दारोदार मासे विक्रीसाठी आलेल्या शंकर मासे विकत घेण्यासाठी मागे लागल्यामुळे तिने पतीला फोन लावून मासे घ्यायचे अथवा नाही याबाबत विचारणा केली. पलीकडून तिच्या पतीने मासे घ्यायचे नाही असे सांगितले. त्यामुळे तिने मासे विक्रेत्याला नकार दिला. त्यानंतर मासे विक्रेता शंकर भोई याने तिला पिण्यासाठी पाणी व नंतर हळूच मोबाईल क्रमांक मागितला.
विवाहीतेने शंकरला पाणी दिले मात्र तिचा मोबाईल क्रमांक दिला नाही. दरम्यान त्याने तिचे कंबर पकडून तिला घरातील बाथरुममधे बळजबरी नेले. मी माझ्या मालकाला फोन लावला असून तो घरी येत आहे असे बोलून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने तिचे तोंड दाबून दोन्ही हात घट्ट पकडून गप्प बसण्यास सांगितले. विवाहितेने कशीबशी सुटका केल्यानंतर पतीला फोन लावून घरी लवकर येण्यास सांगितले. यावेळी घाबरलेला मासे विक्रेता तेथून पळून गेला. काही वेळाने पिडीत विवाहितेचा पती घरी आल्यानंतर त्याला तिने सर्व प्रकार कथन केला. मासे विक्रेता शंकर भोई याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेही सापडला नाही. 2 सप्टेबर रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी 8 सप्टेबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार दिपक वाघ करत आहेत.