बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील आरोपीने चौकशीत दिली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये नेपाळ पोलिसांनी तिघांना अटक केली. यामध्ये दीपक मुंडीसहीत कपिल पंडित आणि राजिंदर दोन शार्प शूटर्सलाही पोलिसांनी पश्चिम बंगाल-नेपाळ सीमेवरून अटक केली. यापैकी कपिल पंडित याने सलमान खान याच्या हत्येच्या कटाची माहिती पोलिसांना दिली आहे. सलमान खान याच्या घराची रेकी देखील करण्यात आली होती असा खुलासा त्याने केला आहे.
सिद्धू मुसेवाला प्रकरणात आतापर्यंत एकूण २३ जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील दोघांना पंजाब पोलिसांसोबत काही आठवड्यापूर्वी झालेल्या चकमकीमध्ये कंठस्थान घालण्यात आलं. त्यानंतरही या प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरु असून या हत्येचा कट रचण्यामध्ये एकूण ३५ जणांचा सहभाग असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. अटक झालेले आणि गोळीबारामध्ये मरण पावलेल्या आरोपींव्यतिरिक्त एकूण १२ आरोपी अद्यापही फरार असल्याचं सांगितलं जात आहे. नुकतेच या प्रकरणात अटक केलेल्या कपिल पंडितने सलमानच्या घराची रेकी केल्याचा दावा केला आहे.
सलमानच्या घराची रेकी करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील काही जण दोन ते तीन वेळा मुंबईत आल्याची माहिती कपिल पंडितने पोलीस चौकशीदरम्यान दिल्याची माहिती पंजाब पोलीस खात्याचे डीजीपी गौरव यादव यांनी दिली आहे. कपिल पंडितने संतोष यादव आणि इतर काही सहकाऱ्यांसोबत आपण स्वत: सलमानच्या वांद्रा येथील घराची रेकी केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. सलमान घरातून कधी निघतो, त्याचे वडील आणि गीतकार सलीम खान हे कधी आणि कुठे मॉर्निंग वॉकला जातात यावर आपण पाळत ठेऊन होतो असंही पंडितने सांगितलं आहे. सलामनच्या दैनंदिन वेळापत्रकासोबतच तो शहरामध्ये कुठे कुठे शुटींगसाठी जातो, त्याचा घरातून निघण्याचा आणि घरी येण्याचा वेळ काय आहे यासंदर्भातील माहिती गोळा केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. संपत नेहरा आणि गोल्डी बरार यांच्या माध्यमातून लॉरेन्स-बिश्नोई टोळीने आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती कपिल पंडितने दिली आहे.