उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळली; राज्याच्या नगररचना सहसंचालकांवर गुन्हा दाखल

काल्पनिक चित्र

पुणे : राज्याच्या नगररचना विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत नाझीरकर यांनी उत्पन्नापेक्षा जास्त प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा नोंद केला आहे. २ कोटी ८५ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता त्यांच्या कब्जात आढळून आली होती. त्यानंतरच्या तपासात ही मालमत्ता १०० ते १५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. बेनामी संपत्ती असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती इनकम टॅक्स विभागाला दिली आहे. त्यांच्याकडून प्राथमिक तपासणी सुरु आहे.

हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (५३), त्यांची पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (४५), त्यांची मुलगी गीतांजली हनुमंत नाझीरकर (२३), मुलगा भास्कर हनुमंत नाझीरकर (२३), सर्व रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड पुणे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अंलकार पोलिस स्टेशनला बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. हनुमंत नाझीरकर यांच्या मुलासह नातेवाईकांवर बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्या म्हणून १७ जून रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.

हनुमंत नाझीरकर हे सध्या पुणे येथे राहतात. सध्या त्यांची अमरावती येथे नेमणूक आहे. एसीबीच्या तपासात नाझीरकर यांच्या पुणे येथे २ व सातारा येथे ३ मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्यांच्या ३ कार, २ दुचाकी, सोन्या – चांदीचे दागदागिने असा एकुण १ कोटी १८ लाख रुपयांचा ऐवज एसीबीकडून जप्त करण्यात आला आहे. या तपासकामी एसीबीने एका स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने केलेल्या तपासणीत हनुमंत नाझीरकर यांच्या कब्जात मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.

या मालमत्ता त्यांनी नातेवाईक, मित्रमंडळींच्या नावाने घेतल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. एसीबीचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोड यांनी तपासातील बेहिशेबी मालमत्तेचा तपास करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाला पत्र दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here