उधारीचे चार लाख परत न देण्याचा उचलला विडा!! व्हाटसअ‍ॅप मेसेजने कल्पनाच्या नशिबी जेलची पिडा

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क):  मनोज संतोष भंगाळे हा एका खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होता. मात्र शिक्षकी पेशात त्याचे मन काही रमले नाही. जमीन खरेदी – विक्री कमीशन एजंट व्यवसायात त्याने पदार्पन केले. या व्यवसायात कमिशनच्या रुपात त्याच्याकडे लक्ष्मीचा ब-यापैकी ओघ सुरु झाला. हळूहळू त्याने व्याजाने पैसे देण्याचे काम देखील सुरु केले. बघता बघता लक्ष्मी देवता त्याला प्रसन्न झाली. हातात खडू आणि डस्टर घेऊन शिक्षकी करुन मिळणा-या उत्पन्नापैकी या व्यवसायात त्याला निश्चितच जास्त पैसे मिळत होते. कृषी आणि अकृषिक जमीनीची विक्री करणारे आणि खरेदी करणारे त्याच्याकडे चालून येऊ लागले. या जमीनीच्या खरेदी  आणि विक्रीच्या व्यवहारातून मिळणारे कमिशन त्याला लाभदायक ठरत गेले. असे म्हणतात की ज्यावेळी मनुष्याची चलती असते, ज्यावेळी मनुष्य यशाच्या शिखरावर असतो त्याचवेळी त्याच्याकडून एखादी घोडचुक होण्याची दाट शक्यता असते. या कालावधीत मनुष्याचा पाय चुकीच्या मार्गाने वाटचाल करतो. चलतीच्या काळातच सावधगिरी बाळगण्याची मनुष्याला गरज असते. यावल तालुक्यातील चितोडा या गावी राहणा-या मनोज भंगाळे या तरुणाच्या बाबतीत देखील तसाच प्रकार घडला.

यावल तालुक्यातील चितोडा या गावी कल्पना शशिकांत पाटील ही महिला रहात होती. कल्पना पाटील या महिलेने मनोज भंगाळे यास चार लाख रुपयांची मागणी केली. व्याजासह वेळेवर चार लाख रुपये परत करण्याच्या बोलीवर विनंती करुन तीने मनोजकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. चार लाख रुपयांचे चांगले व्याज मिळेल या मोहात पडून मनोजने तिला ती रक्कम दिली.

ठरलेली मुदत आल्यावर मनोज तिला व्याजासह चार लाख रुपये मागू लागला. मात्र हातात रक्कम पडल्यानंतर कल्पना पाटील मनोजला हुलकावणी देऊ लागली. आज देते, उद्या देते असे करत करत बरेच दिवस निघून गेले. मात्र कल्पना पाटील काही केल्या मनोजला चार लाख रुपये देत नव्हती. त्या रकमेमुळे मनोजचे आर्थिक चक्र बिघडले होते. व्याज राहिले बाजुला मुद्दल देखील तिच्याकडून मिळत नव्हती. त्यामुळे मनोजच्या मनाची तगमग होत असे. त्याचे इतर व्यवहार त्या रकमेमुळे खोळंबले होते. आपण विनाकारण ते चार लाख कल्पना पाटीलला दिले असा कधी कधी विचार मनोज मनाशी करत होता.

पैशांची निकड तिव्र झाली म्हणजे तो कल्पनाबाईला सारखे सारखे फोन करुन अथवा भेटून आपल्या पैशांची मागणी करत होता. मात्र कल्पना त्याला ताकास तुर लागू देत नव्हती. विविध बहाणे सांगून ती पैसे देण्यास मनोजला फिरवत होती. ती आपल्याला टाळाटाळ करते हे मनोजला चांगल्याप्रकारे समजत होते. मात्र गरजवंताला बुद्धी असून नसल्यासारखी असते. मनोजच्या बाबतीत देखील तसेच झाले होते.

mayat manoj bhangale

संकटकाळात मनुष्य आशादायी राहतो. आज ना उद्या आपले पैसे मिळतील. आज ना उद्या आपले संकट दूर होईल या आशेवर मनुष्य जीवन जगत असतो आणि दिवस काढत असतो. याच संकट कालावधीत मनुष्याला देव मोठ्या प्रमाणात आठवतो. आपले पैसे कल्पनाबाईने लवकरात लवकर द्यावे अशी विनंती तो दररोज देवाला करत होता. मात्र पैसे परत करायचेच नाही असा जणू काही चंग कल्पनाबाईने मनाशी बांधला होता. झोपलेल्या मनुष्याला जागे करता येत असते. मात्र झोपेचे सोंग घेणा-याला जागे करणे कठीण असते. कल्पनाबाईने असेच सोंग घेतले होते. मनोजचे चार लाख द्यायचे नाही हे तिने मनाशी पक्के ठरवले होते. त्यातून मनोजचा आणि तिचा कित्येकदा वाद होत असे. मात्र प्रेमाने बोला अथवा संतापाने कल्पनाबाईच्या मनावर कुठलाच परिणाम होत नव्हता. त्यामुळे मनोज वैतागला होता. मात्र मनोज चिकाटीने तिला आपल्या पैशांची मागणी करण्यात कसर सोडत नव्हता. त्यामुळे कल्पनाबाई देखील मनातून त्याला वैतागली होती.

अखेर मनोजला ठार करण्याचा कुविचार तिच्या मनात चमकून गेला. त्या दृष्टीने तिने नियोजन सुरु केले. मनोजला जीवानिशी कायमचे संपवल्यास आपल्याला त्याचे चार लाख देण्यापासून कायमची मुक्ती मिळेल आणि ते चार लाख आपल्या पचनी पडतील या कुविचारातून कृती करण्यासाठी तिने तिच्या घराजवळ राहणा-या देवानंद बाळू कोळी याची मदत घेण्याचे ठरवले. तिने देवानंद कोळी यास सर्व प्लॅन समजावून सांगितला. मनोजला ठार करण्याच्या बदल्यात कल्पनाबाईने देवानंद कोळी यास सत्तर हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. देवानंद  कोळी हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला भा.द.वि. 392 आणि 326 च्या स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

कल्पनाबाईने देवानंद यास सत्तर हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने मनोजला ठार करण्याचे नियोजन सुरु केले. याकामी त्याने मिनेश भारतसिंग बारेला रा. बोरावल आणि जितेंद्र उर्फ आतंक भगवान कोळी रा. अट्रावल या दोघांची मदत घेण्याचे ठरवले. देवानंद याने दोघांना मनोजच्या हत्येचे नियोजन समजावून सांगितले. जितेंद्र हा देखील पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगावला गुन्हे दाखल आहेत. कल्पना शशिकांत पाटील, देवानंद बाळू कोळी, मिनेश भारतसिंग बारेला आणि जितेंद्र उर्फ आतंक भगवान कोळी या चौघांनी मिळून मनोज संतोष भंगाळे याच्या हत्येचा कट रचला. कुणी काय काम करायचे हे निश्चित झाले.

अखेर मनोज भंगाळे याच्या जीवनातील ती अखेरची काळरात्र जवळ आली. 21 ऑगस्ट 2022 च्या रात्री पैसे घेण्याच्या बहाण्याने मनोजला एकांतात बोलावण्याचे काम कल्पना हिने करायचे निश्चित झाले. कल्पनाकडून पैसे घेण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी मनोज येणार होता. कल्पनाकडून पैसे घेण्याच्या उद्देशाने आलेल्या मनोजवर अगोदरच लपून बसलेल्या साथीदारांनी घातक शस्त्रांनी वार करण्याचे काम निश्चित झाले. अशा प्रकारे सर्व नियोजन चौघांनी मिळून केले होते. ठरल्यानुसार कल्पनाने मनोज यास त्याचे चार लाख रुपये घेण्यासाठी रात्री डोंगरकठोरा फाट्यावर एकट्याने येण्याचा व्हाटस अ‍ॅप मेसेज केला. पैसे घेण्यासाठी एकट्यानेच यावे ही अट तिने व्हाटस अ‍ॅप मेसेजमधे टाकली होती. तिच्या मनातील कावेबाजपणा मनोजच्या लक्षात आला नाही.

Nitin chavhan ASI

मनोजच्या नजरेसमोर केवळ त्याचे उधारीचे चार लाख रुपये फिरत होते. आपल्याला आपले पैसे मिळणार या आशेने तो 21 ऑगस्टच्या रात्री सव्वा आठ वाजता मोटार सायकलसह घराबाहेर पडला तो कायमचाच. घराबाहेर त्याला त्याचा भाऊ हेमराज भेटला. एवढ्या रात्री एकटा कुठे जात आहे? असा प्रश्न हेमराजने त्याला विचारला. कल्पना पाटील हिने मोबाईलवर पाठवलेला व्हाटसअ‍ॅप मेसेज मनोजने त्याचा भाऊ हेमराजला दाखवला. “आठ किंवा साडे आठ वाजता कठोरा फाटयाजवळ या, मग मी निघेल, मी तुम्हाला माझे सर्व प्राब्लेम सांगते, कोणाला सोबत आणु नका” अशा स्वरुपाचा मजकूर हेमराजने वाचला.  एवढ्या रात्री एकटा जावू नको असे हेमराजने मनोज यास म्हटले. त्यावर तो म्हणाला की काही काळजी करु नको मी दहाच मिनीटात परत येतो. एवढे बोलून पैसे मिळण्याच्या आशेने मनोज त्याच्या ताब्यातील मोटारसायकलने निघाला तो कायमचाच. प्रत्यक्षात बोलावलेल्या निर्जन स्थळी कल्पना नव्हतीच. त्या ठिकाणी दबा धरुन बसलेले तिचे साथीदार त्याच्या मागावर टपून बसले होते. 

रात्रीच्या अंधारात जितेंद्र भगवान कोळी याने बॅटरीचा प्रकाशझोत चमकवला. कल्पना पाटील हिनेच बॅटरीचा प्रकाशझोत चमकावल्याचे मनोज यास वाटले. ती उभी बॅटरी घेऊन उभी असल्याचे समजून त्याने त्या दिशेने आपली मोटार सायकल पुढे नेली. मनोज मोटार सायकलवरुन खाली उतरताच त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या जितेंद्र उर्फ आतंक कोळी याने मनोजला घट्ट धरुन ठेवले. देवानंद बारेला याने त्याच्याकडील चाकूने मनोजच्या पाठीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. दरम्यान जवळच अंधारात लपून बसलेल्या मिनेश बारेला याने त्याच्याजवळ असलेल्या विळ्याने मनोजच्या गळ्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मनोजच्या अंगावर सुमारे चौदा वार झाल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडला. गळ्यावर विळ्याचे वार झाल्यामुळे मनोजची श्वास नलिका कापली गेली होती. डावा हात, बगलेमधे जवळपास तिन, पोटावर चार, कमरेवर दोन्ही बाजूने, खांद्यावर दोन, चेह-यावर ओठाच्या खाली एक असे घातक शस्त्रांनी वार झाल्यामुळे तो जागीच गत:प्राण झाला.

रात्रीचे साडे बारा वाजून गेले तरी मनोज घरी परत आला नाही म्हणून त्याची पत्नी शुभांगी बेचैन झाली. तिने मनोजचा भाऊ हेमराज यास म्हटले की तुमचे भाऊ अजून घरी आलेले नाहीत. माझ्या मोबाईलमधे बॅलन्स शिल्लक नसल्यामुळे तुम्ही त्यांना फोन लावून ते कुठे आहेत आणि केव्हा परत येणार आहेत ते विचारा. हेमराजने मनोजला फोन लावला असता तो स्विच ऑफ येत होता. वारंवार फोन करुन देखील मनोजसोबत संपर्क झाला नाही.  

अखेर हेमराजने गल्लीतील त्याचा मित्र शरीफ शहा रशीद शहा याला झोपेतून उठवले. मनोज अद्याप घरी परत आला नसल्याचे हेमराजने त्याला कथन केले. शरीफ यास सोबत घेत हेमराजने मनोजचा शोध सुरु केला. सर्वत्र शोध घेऊन देखील मनोजचा कुठेही शोध लागला नाही. अखेर दोघे जण घरी परत आले. पहाटे दोन वाजता मनोजचा मित्र चेतन कुरकुरे याला विचारणा केली असता त्याने देखील मनोजबद्दल काही माहिती नसल्याचे त्याला सांगितले. हेमराज, शरीफ आणि चेतन या तिघांनी मिळून पुन्हा बेपत्ता मनोजचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिघांमधे कल्पना पाटील हिच्या व्हाटस अ‍ॅप मेसेजची चर्चा झाली. कल्पना पाटील हिने पैसे घेण्यासाठी मनोजला रात्री आठ – साडेआठ वाजेच्या सुमारास एकटे बोलावल्याची माहिती चेतनला देखील होती.  त्यामुळे तिघे मित्र कल्पना पाटीलच्या घरी मनोजचा शोध घेण्यासाठी गेले. मात्र त्याठिकाणी तीच्या घराच्या दरवाज्याला कुलूप होते. तिचे वाहन देखील तेथे नव्हते.

बघता बघता सकाळ झाली. मनोज रात्रीपासून बेपत्ता झाल्याची वार्ता गल्लीत आणि सर्व गावात पसरण्यास वेळ लागला नाही. गल्लीतील लोक मनोजच्या घराजवळ एकत्र आले. दरम्यान उपस्थित सर्व लोकांच्या कानावर एक दुख:द वार्ता आली. सांगवी शेत शिवारात मनोजची मोटार सायकल पडली असून जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडला असल्याची ती बातमी होती. या घटनेची माहिती यावल पोलिसांना देखील समजली होती. या घटनेची माहिती मिळताच सर्व गावक-यांनी घटनास्थळाच्या दिशेन धाव घेतली. घटनास्थळावर यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर आणि त्यांचे सहकारी देखील आले होते. घटनास्थळावर मनोजचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. शेजारीच त्याच्या चपला, रुमाल, चष्मा आदी वस्तू आणि मोटार सायकल पडलेली होती. त्याच्या गळ्यावर, पाठीवर, कमरेवर ठिकठिकाणी घातक शस्त्राचे घाव दिसत होते. गावातील कल्पना पाटील हिने मयत मनोज भंगाळे याच्या व्हाटसअ‍ॅपवर मेसेज पाठवून त्याला रात्री उधारीचे चार लाख घेण्यासाठी बोलावल्याची माहिती हेमराजने पोलिसांना दिली. मृतदेहाची ओळख पटलेली होती. त्यामुळे आता केवळ मारेक-यांना ताब्यात घेऊन हत्येचे कारण स्पष्ट करण्याचे प्रमुख काम बाकी होते.

या घटनेप्रकरणी मयत मनोज भंगाळे याचा भाऊ हेमराज भंगाळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत कल्पना पाटील व इतर अज्ञात मारेक-यांविरुद्ध खूनाचा गुन्हा यावल पोलिस स्टेशनला दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 396/22 भादवि कलम 302, 34 नुसार दाखल करण्यात आला. घटनास्थळी फैजपूर उप विभागाचे डिवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उप निरीक्षक विनोद खांडबहाले, सहायक फौजदार नितीन चव्हाण, सहायक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान, सहायक फौजदार असलम खान, पो.कॉ. जगन्नाथ पाटील, सुशिल घुगे आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली.

या गुन्ह्यात चितोडा येथील कल्पना पाटील हिचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यानंतर तिला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. तिने दिलेल्या माहीतीनुसार देवानंद कोळी, मिनेश बारेला आणि जितेंद्र कोळी या तिघांची नावे देखील समोर आली. फैजपूर उप विभागाचे डिवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस स्टेशनचे पो.नि. राकेश मानगावकर आणि त्यांच्या सहका-यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु केला. क्रमाक्रमाने देवानंद बाळू कोळी (रा. चितोडा ता. यावल), मिनेश उर्फ विघ्नेश भारतसिंग बारेला (रा. निमगाव ता. यावल) आणि जितेंद्र कोळी अशा चौघांना अटक करण्यात आली.

मनोज भंगाळे याच्याकडून कल्पना पाटील हिने चार लाख रुपये उधार घेतले होते. ती रक्कम देण्यास कल्पना पाटील टाळाटाळ करत होती. त्यातून तिचे आणि मनोज भंगाळे याच्यात वाद सुरु होते. मनोज भंगाळे यास कायमचे संपवून टाकल्यास त्याचे चार लाख रुपये देण्याचे काम थांबेल आणि त्याचा तगादा देखील कायमचा बंद होईल यासाठी कल्पना पाटील हिने देवानंद कोळी यास सत्तर हजारात मनोज भंगाळे यास जीवे ठार करण्याचे काम दिले होते. देवानंद कोळी याने याकामी त्याचे साथीदार मिनेश उर्फ विघ्नेश बारेला आणि जितेंद्र कोळी यांच्या मदतीने मनोजला ठार केले. मात्र कल्पना पाटील हिच्या व्हाटस अ‍ॅप वरील मेसेजमुळे पोलिस तिच्यापर्यंत पोहोचले. तिला अटक केल्यानंतर देवानंद बाळू कोळी याच्यासह त्याचे साथीदार मिनेश बारेला आणि जितेंद्र कोळी यांचा सहभाग उघड झाला. चार लाख रुपयांच्या उधारी देण्यापासून बचाव करण्यासाठी कल्पना पाटील हिने मनोज भंगाळे यास साथीदारांच्या मदतीने ठार करण्याचे पाऊल उचलले. मात्र ती आणी तिचे साथीदार खूनाच्या गुन्ह्यात अडकले. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पुरावा मागे ठेवून जात असतो. अटकेतील संशयीत आरोपींना यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायधिश एम. एस. बनचरे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्याचे सरकारपक्षाच्या वतीने न्यायालयीन कामकाज सरकारी वकील अ‍ॅड. नितीन खरे यांनी पुर्ण केले. या गुन्ह्याचा पुढील तपास डिवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राकेश मानगावकर व त्यांचे सहकारी सहायक फौजदार नितीन चव्हाण करत आहेत. त्यांना पोलिस उप निरीक्षक विनोद खांडबहाले, सहायक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान, सहायक फौजदार असलम खान, पो.कॉ. जगन्नाथ पाटील, सुशिल घुगे आदींचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here