जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावी मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडीलोपार्जीत घराच्या वादाची किनार या घटनेला असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यवान धोंडू महाजन असे मयताचे तर भगवान धोंडू महाजन असे संशयित मारेकरी भावाचे नाव आहे.
एरंडोल तालुक्यातील भातखंडे गावानजीक गिरणा नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. उत्राण येथील सत्यवान धोंडू महाजन याचा हा मृतदेह असल्याचे तसेच हा घातपात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी मयताचा मोठा भाऊ संशयित भगवान महाजन यास अटक करण्यात आली आहे. चौकशीअंती त्याने गुन्हा कबूल केला आहे. 12 सप्टेंबर रोजी सत्यवान याने घरातील मोरीत लघुशंका केली होती.
या घटनेचा मोठा भाऊ भगवान यास राग आला होता. त्यावेळी दोघा भावांमध्ये झालेल्या वादासह वडिलोपार्जित घराचा वाद देखील उफाळून आला होता. संतप्त झालेल्या भगवान याने सत्यवान याच्या डोक्यात मुसळीचे चार ते पाच घाव घातल्याने तो जागीच मरण पावला.या घटनेनंतर भगवानने सत्यवान याचा मृतदेह घरातील पलंगाखाली लपवून ठेवला. त्यानंतर पडलेले रक्त कापडाने व गोणपाटाने पुसुन काढले. रात्री उशीरा त्याने पोत्यातून सायकलवर नेलेला मृतदेह नेर गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला. त्यानंतर भगवान गावातून फरार झाला होता. उत्राण गावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल स्थानकावरून भगवान महाजन यास अटक केली. अधिक तपास सपोनि नीता कायटे करत आहेत.