जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील वेळोवेळी तिचा पाठलाग करुन प्रेमसंबंध निर्माण करण्यास तिच्यावर दडपण टाकून खूनासह बदनामीची धमकी देणा-या तरुणाविरुद्ध विविध कलमानुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दगडू पाटील रा. मल्हारपुरा चोपडा असे संबंधीत तरुणाचे नाव आहे.
चोपडा येथील महाविद्यालयात शिक्षण घेणा-या सतरा वर्षाच्या तरुणीचा अनेक दिवसांपासून सागर पाटील हा वेळोवेळी पाठलाग करत होता. तिच्या मोबाईल क्रमांकावर तो वेळोवेळी संपर्क साधून तिला बळजबरी प्रेमसंबंध निर्माण करण्यास हैरान करत होता. प्रेमसंबंध ठेवले नाही तर दिड महिण्यापुर्वी घडलेल्या घटनेप्रमाणे तुझा खून करुन टाकेन तसेच सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन अशी धमकी देत तिचा हात पकडून तुला माझ्यासोबत लग्न करावेच लागेल अशी गळ त्याने घातली.
तिच्या मनाला लज्जा वाटेल असे गैरकृत्य करत तिला चापटांनी मारहाण केल्याने संतप्त अल्पवयीन मुलीने त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. अजित सावळे करत आहेत. सागर यास अटक करण्यात आली आहे.