जळगाव : रस्त्यात पंक्चर झालेल्या ट्रकवर जॅक चढवत असतांना आलेल्या दुचाकीस्वाराने ट्रकचालकासह ट्रकमालकास जखमी करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली आहे. फिरोज इक्बाल शेख रा. धुळे मुळ रा. तांबापुरा बिस्मिल्ला चौक जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पारोळा शहरानजीक विचखेडा गाव शिवारात ट्रक चालक नंदुसिंग धनसिंग महेर रा. जालना हा ट्रक चालक त्याच्या ताब्यातील पंक्चर झालेल्या ट्रकला जॅक लावत होता. 27 सप्टेबर रोजी घडलेल्या या घटनेदरम्यान त्याठिकाणी फिरोज इक्बाल शेख मोटार सायकलने आला. त्याने नंदुसिंग महेर याच्या अंगठयावर चाकूने वार केले. तसेच ट्रकमालक मंगलसिंग यांच्या पोटात जबर वार करुन त्यांना जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला.
नंदुसिंग महेर याच्याकडील 800 रुपये रोख, 2700 रुपये किमतीची चांदीची चेन तसेच अन्य एकाजवळ असलेले शंभर रुपये असा एकुण 3600 रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरुन नेला. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे करत आहेत.