जळगाव : घरगुती ज्वलनशील गॅस वाहनांमधे इंधन स्वरुपात बेकायदेशीररित्या भरुन देणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. जावेद खान सलीम खान आणि मोसीम ऊर्फ दत्ता शेख हमीद दोघे रा. मास्टर कॉलनी, जळगांव अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.
एमआयडीसी परिसरातील अजिंठा चौफुलीजवळ बस स्टॉपच्या मागे दोघे जण वाहनांमधे घरगुती ज्वलनशिल गॅस इंधनाच्या स्वरुपात भरुन देतांना पोलिस पथकाला आढळून आले. कारवाई दरम्यान त्यांच्याकडून 7 हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे 5 गॅस सिलेंडर, 4800 रुपये किमतीचे दोन सिलबंद सिलेंडर, 3460 रुपये रोख, 11 हजार 500 रुपये किमतीची मशीन, वजनकाटा व इतर साहित्य असा एकुण 26 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पो.हे.कॉ. विजय नामदेव सोनवणे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला भा.द.वि. 285 सह जिवनावश्यक वस्तू कायदा कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोना इमरान अली सैय्यद, पोना मुज्जफर नौशाद काझी, पोकॉ. गोविंदा पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे व हे.कॉ. किरण पाटील करत आहेत.