जळगाव : उसतोड मजुर हवे असलेल्या शेतक-याचे साडेपाच लाख रुपये घेवून फरार झालेल्या संशयिताविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबराव बाविस्कर रा. शेंदुर्णी ता. जामनेर असे गुन्हा दाखल झालेल्या फरार संशयीताचे नाव आहे.
सुरेश औदुंबर घोडके रा. पंढरपुर जिल्हा सोलापूर हे उस उत्पादक शेतकरी असून त्यांना उसतोडीसाठी मजुरांची आवश्यकता होती. एका मध्यस्तामार्फत ते शेंदूर्णी येथील रहिवासी साहेबराव बाविस्कर यांच्याकडे आले होते. उस तोडीसाठी लागणारी मजुरी ठरल्यानंतर मजुर घेण्यासाठी ते ट्रकसह शेंदुर्णी येथे आले होते. मजुर ट्रकमधे बसल्यानंतर हाती आलेल्या साडे पाच लाखाच्या रकमेसह साहेबराव बाविस्कर हे फरार झाल्याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास प्रशांत विरनारे करत आहेत.