जळगाव : पाच हजार रुपयांसाठी झालेल्या वादातून खूनाचा उलगडा करण्यात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला दाखल असलेल्या अकस्मात मृत्यूच्या तपासात खूनाचा उलगडा चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहका-यांनी यशस्वीरित्या केला आहे.
दिनांक 20 ऑगस्ट रोजी चाळीसगाव – कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्टच्या अलीकडे सुमारे 100 मीटर अंतरावर खोल दरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकारणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. या अकस्मात मृत्यूचा तपास सहायक पोलिस निरीक्षक हर्षा जाधव या करत होत्या.
अनोळखी मयताचा पुर्णपणे कुजलेला चेहरा फोटोग्राफर अनिकेत जाधव यांच्या मदतीने कमी अधिक प्रमाणात विकसीत करण्यात आला. मयताच्या कपड्यावरुन ओळख पटण्याकामी मदत झाली. फोटोतील मयत इसम मधुकर रामदास बुटाले (45), रा. पुंडलीक नगर, औरंगाबाद असल्याचे तपासात उघडकीस आले. मयत मधुकर बुटाले याचा घातपात झाला असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. मयताच्या मारेक-यांचा कुठलाही मागमुस नसतांना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारांसह तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मारेकरी शोधण्यात आले.
मयताचा मेहुणा गोपाल शंकर पंडीत (32) व त्याचा मित्र कृष्णा रामदास भोसले दोघे रा. औरंगाबाद यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. मयताची विवाहीत मुलगी धुळे येथे रहात असल्यामुळे मयत औरंगाबाद येथून धुळे येथे जात असतांना मद्याच्या नशेत कन्नड घाटात पडला असावा अशी गोपाल पंडीत याने दिशाभुल करणारी माहिती पोलिसांना सुरुवातीला दिली. मात्र त्याला विचारपुर्वक माहिती विचारुन प्रसंगी पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडुन घटना समजून घेण्यात आली. अखेर त्याने आपला गुन्हा कबुल केला.
दि. 27 ऑगस्ट 2022 रोजी गोपाल पंडीत व त्याचा मित्र कृष्णा भोसले असे दोघे मयत मधुकर बुटाले याला औरंगाबाद येथील रामगिरी हॉटेल येथून सोबत घेवून निघाले होते. गोपाल पंडीत याच्या रिक्षाने सावित्रीनगर मार्गे वरुड गावी जात असतांना पाच हजार रुपये देण्याघेण्याच्या वादातून कृष्णा भोसले व मयत मधुकर बुटाले यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून कृष्णा भोसले याने मधुकर बुटाले याचा गळा दाबून खून केला. तो मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह रिक्षाने कन्नड घाटात आणून जय मल्हार पॉईंट जवळ असलेल्या दरीत फेकून दिला. दोघे संशयीत आरोपी सध्या चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक हर्षा जाधव, सहायक फौजदार राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ युवराज नाईक, नितीन सोनवणे, पोना शांताराम पवार, शंकर जंजाळे, पोना संदिप माने, पोना मनोज पाटील, पोना प्रेमसिंग राठोड, अनिल अगोणे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.