जळगाव : अॅलोपॅथीची औषधी लिहून देण्यास सक्षम नसतांना महिला रुग्णावर निष्काळजीपणे प्राथमिक उपचार करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या आरोपाखाली डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील विवरा बुद्रुक येथील समर्थ क्लिनिक चालवणारे डॉ. प्रशांत सोपान अहिरे यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्री सचिन पाटील (28) असे मृत्यु झालेल्या महिला रुग्णाचे नाव आहे.
गायत्री सचिन पाटील या महिला रुग्णावर डॉ. प्रशांत अहिरे यांनी त्यांच्या विवरा या गावी असलेल्या समर्थ क्लिनिक मधे 13 मे 2021 रोजी उपचार केले होते. उपचारादरम्यान गायात्री पाटील यांचे निधन झाले होते. या घटनेप्रकरणी 30 सप्टेबर 2022 रोजी पोलिस उप निरीक्षक काशिनाथ श्रावण कोळंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. प्रशांत अहिरे यांच्याविरुद्ध भा.द.वि. 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ करत आहेत.