जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा – शामा फायर वर्क्स परिसरातून चोरी झालेल्या रिक्षासह दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल रमेश चौधरी, रा सिध्दीविनायक शाळेजवळ अयोध्या नगर आणि मोहसीन सिकंदर शहा रा तांबापुर जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
जाकीर बिस्मिल्ला बागवान यांच्या मालकीची प्रवासी रिक्षा तांबापुरा परिसरातून 30 सप्टेबरच्या रात्री चोरी झाली होती. या चोरीप्रकरणी 1 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार अनिल रमेश चौधरी याने हा चोरीचा गुन्हा केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अतुल वंजारी, चेतन सोनवणे, किशोर पाटील, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, होमगार्ड विजय कोळी व संजय सोनवणे आदींच्या पथकाने त्याला अयोध्या नगर परिसरातून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात त्याचा साथीदार मोहसिन शहा सिंकदर शहा आणि रिजवान शेख उर्फ काल्या शेख गयासोद्दीन यांचा सहभाग उघड झाला.
अधिक तपासात मोहसीन शहा सिकंदर शहा याला फुकटपुरा – तांबापुरा परिसरातून अटक करण्यात आली आहे. तिसरा फरार आरोपी रिजवान उर्फ काल्या शेख याचा शोध सुरु आहे. अनिल चौधरी याच्याविरुद्ध यापुर्वी चोरीचे चार गुन्हे, रिजवान उर्फ काल्याविरुद्ध विस आणि मोहसीन शहा याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. अटकेतील दोघांना न्या. आर. वाय. खंडारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अॅड. निखील कुलकर्णी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. अटकेतील दोघांकडून चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.