जळगाव : बांधकामाचे साहित्य सहाव्या मजल्यावर पोहोचवण्याकामी तयार केलेली लिफ्ट अंगावर पडून तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात 3 ऑक्टोबर रोजी घडली होती. प्रथमेश संतोष वाघ (20) रा. खेडी खुर्द – जळगाव असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी बांधकाम स्लॅब ठेकेदारासह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत सोनवणे, शिवा सोनवणे व संबंधीत इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मेहरुण तलाव परिसरात अनिस शहा यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामावर सहाव्या मजल्यावर बांधकाम मटेरियल पोहोचवण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. 3 ऑक्टोबर रोजी सदर लिफ्ट सुरक्षीत स्थितीत नसल्यामुळे तसेच मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची साहित्य व साधने देण्यात आली नव्हती. बांधकामादरम्यान लिफ्ट सहाव्या मजल्यावर जात असतांना अचानक लिफ्टचा पाईप तुटला. त्यामुळे लिफ्ट तुटून ती खाली काम करत असलेल्या दिपक जयप्रकाश पाटील व प्रथमेश वाघ या दोघांच्या अंगावर कोसळली. या घटनेत दिपक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. प्रथमेश वाघ याचा मृत्यु ओढवल्याने परिसरात शोककळा पसरली होती. दिपकच्या दुखापतीसह प्रथमेश वाघ याच्या मृत्युस कारणीभुत ठरणा-या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे पुढील तपास करत आहेत.