जळगाव : माझ्या पतीच्या अंगात अजमेरचे पीरबाबा येतात. आम्ही लोकांचे संकट दूर करतो. आमच्याकडे अजमेर, मुंबई, दिल्ली, राजस्थान या ठिकाणचे लोक येवून त्यांच्या समस्या सोडवून जातात. अशा भुलथापा देवून ग्राफिक डिझायनर महिलेची अकरा लाख रुपयात फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोघा पती पत्नीविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित हिंमतराव पाटील आणि महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील दोघे रा. मेरा घर, घर नं. 503, 504 सावखेडा शिवार जळगाव असे गुन्हा दाखल झालेल्या पती पत्नीची नावे आहेत.
जळगाव शहरातील ग्राफिक डिझायनर महिलेने आपली घरगुती समस्या महिमा उर्फ मनोरमा पाटील या महिलेस सांगितली होती. ग्राफिक डिझायनर महिलेची समस्या ऐकताच महिमा पाटील हिने पिडीत महिलेची मानसिकता हेरली. आपल्या पतीच्या अंगात अजमेरचे बाबा येतात. माझ्या पतीकडे अजमेर, राजस्थान, मुंबई, दिल्ली आदी ठिकाणचे लोक समस्या घेवून येतात आणि समस्या सोडवून नेतात अशा भुलथापा महिमा पाटील या महिलेने त्या ग्राफिक डिझायनर महिलेला दिल्या. या भुलथापांना बळी पडून पिडीतेने ललित आणि महिमा पाटील या दाम्पत्याची त्यांच्या घरी जावून भेट घेतली. त्यावर या दाम्पत्याने तिला आपला शब्दांच्या जाळ्यात अडकवले.
तुझ्या दिराने आत्महत्या केली असून त्याच्या आत्म्याने तुझ्या शरिरात प्रवेश केला आहे. त्यामुळे तुझ्या घरात वाद सुरु आहेत. तुझ्या दिराचा त्रास देणारा आत्मा आणि तुझ्या घरावर झालेली करणी पुजा करुन काढावी लागेल. तुला आम्ही गुप्तधन देखील मिळवून देवू अशा भुलथापांना पिडीत महिला बळी पडली. या पुजेसाठी या दाम्पत्याने पिडीतेकडून वेळोवेळी रोखीने आणि ऑनलाईन पद्धतीने एकुण 11 लाख 32 हजार 950 रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीतेने आपली रक्कम दोघांना परत मागितली. माझ्या नादी लागू नका अन्यथा तुमच्या सात पिढ्या बरबाद करुन टाकेन यासह जीवे मारण्याची धमकी दिली. सन 2021 ते 2022 या कालावधीत झालेल्या या फसवणूकी प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करत आहेत.