जळगाव : कुलुपबंद घराचा कडीकोंडा तोडून घरातील 2 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मोहाडी रोड परिसरात उघडकीस आली आहे. हर्षा गोविंद भागवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षा गोविंद भागवानी आणि त्यांचे पती आलोक शिवाणी हे दोघे खासगी नोकरदार दाम्पत्य आहे. दोघे पती पत्नी मुंबई येथे कामानिमीत्त गेले होते. हर्षा भागवानी यांचे सासु सासरे देखील गेल्या पंधरा दिवसांपासून परगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या मोहाडी रोड परिसरातील घराच्या मुख्य दरवाज्याला कुलुप लावलेले होते.
हर्षा भागवानी यांना 12 ऑक्टोबर रोजी घरी परत आल्यानंतर घराचा कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत आणि घरातील कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त झाले असल्याचे आढळून आले. अधिक तपासणीअंती 14 हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने, चांदीचे नाणे, मोबाईल याशिवाय आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन असा एकुण 2 लाख 27 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाला असल्याचे आढळून आले. अज्ञात चोरट्या विरुध्द दाखल केलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.