मुंबई दि.15 प्रतिनिधी – जैन इरिगेशनने कायमच शेत, शेती व शेतकरी हेच केंद्रबिंदू मानले आहे. कंपनीद्वारे विविध प्रयोग करुन शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडावा, सर्वांगिण विकासातून आर्थिक समृद्धी साधता यावी यासाठीच जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ही कंपनी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.
मुंबई येथील जगप्रसिद्ध हाॅटेल ताजमहाल पॅलेस, गेट वे ऑफ इंडिया येथे कंपनीच्या वतीने आयोजित वितरक परिषदेत अशोक जैन बोलत होते. दोन दिवसीय वितरक परिषदेस महाराष्ट्रातून 171 निमंत्रित वितरक सहभागी झाले होते. अशोक जैन यांनी सांगितले की, जैन इरिगेशनची कायम शेतकऱ्यांशीच बांधिलकी राहणार आहे, जैन इरिगेशनचे प्रत्येक उत्पादन हे शेतकऱ्यांच्या विकासाला पूरक ठरेल असेच असेल. यातून बळिराजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या परिषदेला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, विपणन प्रमुख अभय जैन, अथांग जैन, अभेद्द जैन, स्टेट हेड एस. एन. पाटील, केळीतज्ज्ञ के. बी. पाटील व कंपनीचे महाराष्ट्रातील सर्व विभागीय व्यवस्थापक उपस्थित होते.
परिषदेच्या सुरूवातीला वितरकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी कंपनीच्या वाटचाली बाबतचे सविस्तर सादरीकरण केले. एस. एन. पाटील यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांचे सादरीकरण केेले, तर के. बी. पाटील यांनी ऊती संवर्धित संबंधित रोपाविषयी मार्गदर्शन केले.
कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांचे जे आर डी टाटा हे आदर्श होते, त्यांची तत्वे आणि मूल्य त्यांनी कायमच अंगीकारली होती. आपण सर्वजण समाजाचे विश्वस्त असल्याने आपल्या मिळकतीच्या अधिक पटीने समाजाला देण्याची भावना ठेऊनच जैन इरिगेशनचे कार्य अविरत सुरू आहे. जैन इरिगेशनने शेतकऱ्यांच्या हितासाठी आतापर्यंत १२ हजार कोटींची गुंतवणूक केली असून याद्वारे ८० लाख शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अनिल जैन यांनी जगभरातील पर्यावरण बदलाची व त्याचा शेतीवर होणारा परिणाम याची सविस्तर माहिती विषद केली.
या परिषदेत कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनीही मनोगत व्यक्त करून वितरकांच्या विविध विषयांवर व बाजार पेठेत आणि व्यवसायात असणारी आव्हाने, होत असलेले बदल, अनुषंघाने व्यापाराचे परिवर्तन व धोरणनीती कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय परिषदेत वितरकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच वितरकांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ६० वितरकांना ‘ग्रोथ ड्रायव्हर, बीयांड ग्रेटफुल, सैल्युट टू लाॅयल्टी’ या पुरस्कारांनी तसेच कंपनीच्या विविध उत्पादनांची विक्रमी विक्री करण्याचा ६ वितरकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वितरकांच्यावतीने व्यवस्थापनाचा देखील सन्मान करण्यात आला. वितरक परिषेदेचे सूत्रसंचालन के. बी. पाटील यांनी केले. आभार अतुल जैन यांनी मानले.