जळगाव : बंद असलेल्या कंपनीतून चोरलेली भंगार कार क्रेनच्या सहाय्याने टोईंग करुन नेणा-या चौघांना एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली आहे. अमन सय्यद रशीद सय्यद, रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी, जळगांव, अजय भागवत सुरवाडे, रा. सागर शॉपिंग जवळ, अयोध्या नगर, जळगांव, सचिन मुकेशसिंग राठोड रा. अयोध्या नगर, जळगांव, मोहसीन खान सुभान खान, रा. शेरा चौक, रझा कॉलनी, जळगांव अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.उप.निरीक्षक अनिसोद्दीन शेख, पो.ना. हेमंत कळकसर व पो. कॉ. चंद्रकांत पाटील आदींचे 14 ऑक्टोबर च्या रात्रीगस्तीवर कार्यरत होते. दरम्यान मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास चौघे संशयित भंगार कार क्रेनच्या सहाय्याने वाहून नेत असल्याचे पोलिस पथकाला आढळून आले. एमआयडीसीतील हॉटेल कमल पॅरेडाईज समोर त्यांना आढळून आलेल्या चौघांना त्यांच्या ताब्यातील कार, क्रेन, मोटारसायकल अशा एकुण 1 लाख 70 हजार रुपयांच्या मुद्देमालासह चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपला कार चोरीचा गुन्हा कबुल केला.
अमन सैय्यद रशीद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध 11 तर मोहसीन विरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत.
अटकेतील सर्वांना न्या. श्रीमती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. इम्रानअली सैय्यद, पो.ना, सचिन पाटील आदी करीत आहेत.