पुणे/नारायणगाव : सावकारी प्रकरणी गुन्ह्यात जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी स.पो.नि. व पोलिस नाईक या दोघांना महागात पडल्याची घटना पुणे जिल्हयात घडली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन केशव घोडे-पाटील (३८) व पोलीस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचे चार्जशिट लवकर दाखल करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने पैसे मागितले.
सावकाराने एकाला डांबून ठेवले होते. सावकाराला जामीन देण्यासह इतर दोघांना आरोपी न करण्यासाठी स.पो.नि. घोडे-पाटील यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदारास केली होती. तशी तक्रार तक्रारदाराकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. ७ ऑगस्ट रोजी त्याबाबत पडताळणी करण्यात आली. त्यावेळी स.पो.नि.घोडेपाटील यांनी पोलिस नाईक धर्मात्मा हांडे याच्या मार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने नारायणगाव येथे सापळा रचला होता. दरम्यान दोघांना संशय आल्याने लाच घेण्यासाठी कुणीही आलेच नाही. पथकाने दोन दिवस वाट पाहिली. मात्र, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे दोघांवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील बिले पुढील तपास करत आहेत.