दरोडयाच्या तयारीत असलेल्या टोळीला हडपसर येथे अटक

On: August 12, 2020 2:58 PM

पुणे : हडपसर – मगरपट्टा येथील सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या विशाल सातपुते टोळीतील सात जणांना गुन्हे शाखेच्या युनिट तिनच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १२ बोअरची रायफल, देशी रिव्हॉल्व्हर, सहा काडतुसे, दोन कोयते, फॉर्च्युनर कार व दुचाकी असा एकुण १४ लाख ७४ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुते (३०) रा.पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ, राजू शिरीष शिवशरण (२८), रा़ ठोंबरे वस्ती, पंकज सदाशिव गायकवाड (३५), रा़ कोलवडी, ता़ हवेली, आकाश राजेंद्र सकपाळ (२६), रा. रविराज टेरेस, सुखसागर नगर, गणेश मारुती कुंजीर (२७), रा. कुंजीरवस्ती, थेऊर, रामेश्वर बाळासाहेब काजळे (३३), रा. वडगाव शेरी, ऋषिकेश राजेंद्र पवार (१९), रा़ कोलवडी, ता़ हवेली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

विशाल सातपुते याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी असे सहा गुन्हे यापुर्वी दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात तो सध्या पॅरोलवर बाहेर आला होता. त्याच्या साथीदारांवर देखील विविध गुन्हे दाखल आहेत. ते देखील पॅरोलवर बाहेर आले आहेत.  मिळालेल्या गुप्त माहितीनुसार युनिट ३ चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक किरण अडागळे व त्यांच्या सहकार्‍यांनी मगरपट्टा सिटी परिसरातील फ्लॅटवर छापा घातला. या ठिकाणी विशाल सातपुतेसह सात जणांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रायफलसह घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. हडपसर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध दरोड्याच्या तयारीसह साथ रोग प्रतिबंधक अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment