अल्पवयीन मुलीस पळवून चौघांचा सामुहिक बलात्कार

जळगाव : जळगाव येथील अल्पवयीन मुलीवर रावेर तालुक्यातील पाल या निर्जनस्थळी चौघांनी आळीपाळीने सामुहीक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेत गर्भधारणा झालेल्या मुलीचा गर्भपात झाल्यानंतर तिच्या वडीलांनी तिचा विवाह एका कॅन्सरग्रस्त इसमासोबत लावून दिल्याचे देखील उघड झाले आहे. रवी छपरीबंद, पुजा छपरीबंद (रवीची पत्नी) व इतर चार तरुण सर्व रा. रावेर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील सदर अल्पवयीन मुलगी सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील चौघांनी तिच्यावर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिला पळवून नेले. तिच्यावर रावेर तालुक्यातील पाल येथील निर्जनस्थळी चौघांनी आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर चौघांनी तिला रवी छपरीबंद याच्या रावेर येथील घरात डांबून ठेवले. पुजा व धीरज या दोघांनी तिला चापटाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करत बलात्काराचा व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पिडीतेने म्हटले आहे.

पिडीत अल्पवयीन मुलीने स्वत:ची सुटका केल्यानंतर देखील चौघांनी तिला फोन करुन तिच्यासोबत बलात्कार केल्याचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकीमुळे पिडीत चौघांकडे गेली असता तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आला. या कृत्यामुळे ती गर्भवती झाली. त्यामुळे तिने नाईलाजाने गर्भनिरोधक गोळ्या घेवून आपला गर्भपात घडवून आणला. आपल्या परिवारावरील अरिष्ट टाळण्यासाठी तिच्या वडीलांनी तिचा विवाह एका कॅन्सरग्रस्त इसमासोबत लावून दिल्याचा देखील खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.नि. कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here